
Mumbai Accident Malad: अपघातात महिला वकिलाचा मृत्यू; ७० वर्षीय चालकावर व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा आरोप,भाजप नगरसेवकाचा हस्तक्षेप
धडकेत महिलेचा जागीच मृत्यू
मालाड पश्चिमेकडील एस. व्ही. रोड आणि मामलेदारवाडी जंक्शन येथे रविवारी हा अपघात झाला. सिग्नलवर थांबलेल्या स्कूटीसह तीन ऑटो रिक्षांना भरधाव आणि अनियंत्रित कारने धडक दिली. या अपघातात स्कूटीवर मागे बसलेल्या ३४ वर्षीय महिला वकील प्रियंका मयांक सत्रा यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचे पती मयांक सत्रा यांच्यासह तीन रिक्षाचालक आणि इतर जण गंभीर जखमी झाले.
आरोपीची जातमुचलक्यावर सुटका
या घटनेनंतर पोलिसांनी कारचालक कृष्णा चमणकर याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मुक्त करण्यात आल्याची माहिती आहे. या निर्णयामुळे मृत महिलेच्या कुटुंबीयांसह नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र
भाजपचे नगरसेवक प्रवीण छेडा यांनी या प्रकरणात पोलिसांकडून आरोपीला विशेष वागणूक देण्यात आल्याचा आरोप केला आहे. मयत प्रियंका सत्रा या प्रवीण छेडा यांच्या नातेवाईक आहेत. या प्रकरणात अपघाताच्या स्वरूपाचा तपास करण्याबरोबरच, परिस्थितीनुसार कठोर कलमांतर्गत गुन्हा दाखल करावा आणि आरोपीला मदत करणाऱ्यांचीही चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
याबाबत प्रवीण छेडा यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र दिले असून, ते पोलीस आयुक्त देवेन भारती यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
व्हीलचेअरवरून दिला अखेरचा निरोप
या अपघातामुळे सत्रा कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. प्रियंका यांच्या पश्चात आठ वर्षांची मुलगी आणि चार वर्षांचा मुलगा आहे. आईच्या अचानक झालेल्या मृत्यूने दोन्ही मुलांना मोठा धक्का बसला आहे. अपघातात प्रियंका यांचे पती मयांक सत्रा हेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असतानाही पत्नीला अखेरचे पाहता यावे, यासाठी ते अंत्यसंस्काराच्या वेळी व्हीलचेअरवरून स्मशानभूमीत पोहोचले. गंभीर अवस्थेतील पतीने पत्नीला दिलेला हा अखेरचा निरोप उपस्थितांना भावूक करून गेला. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांकडून नेमकी कोणती कलमे लावण्यात आली, चालकाला जामीन कोणत्या आधारावर मिळाला आणि अपघातामागील काय परिस्थिती होती, याबाबत पुढील तपासानंतर अधिक स्पष्टता येणार आहे.