
Mumbai Crime: ९९ रुपयांच्या आमिषात ७३ हजारांचा चुना! बनावट Facebook पेजद्वारे महिलेची फसवणूक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ जुलै २०२६ रोजी पीडित महिलेला फेसबुकवर ‘विझार्ड ट्रेडर्स ७’ नावाचे पेज आढळले. या पेजवर केवळ ९९ रुपये भरल्यानंतर ९ हजार ९९९ रुपये मिळतील, अशी जाहिरात करण्यात आली होती. कमी रक्कम गुंतवून मोठा परतावा मिळणार असल्याच्या आमिषामुळे महिलेने जाहिरातीमध्ये दिलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधला.
हेही वाचा: Scam News: चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून विश्वास जिंकला अन् 22 लाखांना गंडा घातला
यानंतर आरोपींनी महिलेला क्यूआर कोड पाठवून त्यावर पैसे भरण्यास सांगितले. महिलेने गुगल पेच्या माध्यमातून सुरुवातीला ९९ रुपये पाठवले. मात्र, त्यानंतर आरोपींनी वेगवेगळी कारणे सांगत तिच्याकडून अतिरिक्त रक्कम मागण्यास सुरुवात केली. विविध शुल्क, प्रक्रिया आणि इतर कारणांचा आधार घेत आरोपींनी महिलेच्या खात्यातून एकूण २२ व्यवहार केले. या व्यवहारांद्वारे महिलेच्या खात्यातून तब्बल ७३ हजार ५२१ रुपये काढून घेण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रारीनंतर पोलिसांच्या सायबर पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला. आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांनी राजस्थानातील जयपूर आणि दौसा जिल्ह्यांत चार दिवस शोधमोहीम राबवली. आरोपी वारंवार ठिकाणे बदलत असल्याने त्यांना पकडणे पोलिसांसाठी आव्हान ठरत होते.
अखेर पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून दीपक सिताराम मीना (२१) आणि हरकेश गोपाल मीना (३०) या दोघांना अटक केली. दोघेही राजस्थानचे रहिवासी आहेत. पोलिसांनी आरोपींकडून दोन आयफोन, एक ओप्पो मोबाईल, ११ सिमकार्ड, एनएसडीएल बँकेचे डेबिट कार्ड आणि पेटीएम क्यूआर स्कॅनर असा मुद्देमाल जप्त केला आहे. या आरोपींनी आणखी किती नागरिकांची अशाच पद्धतीने फसवणूक केली आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.