
Mumbai FDA Action: कुठे उघडे गटार, कुठे कच्चे मांस; मुंबईतील ७ खाद्य आस्थापनांवर FDA ची धडक कारवाई
कांजूरमार्ग येथील श्री गजानन वडापाव आणि स्नॅक्स सेंटरच्या तपासणीत अन्न गरम करणे, थंड करणे आणि रेफ्रिजरेशनच्या तापमानावर नियमित लक्ष ठेवले जात नसल्याचे आढळले. स्वयंपाकघराला दरवाजा नसल्याने कीटकांचा प्रवेश होण्याचा धोका निर्माण झाला होता. तसेच अन्नाच्या संपर्कात येणारी काही उपकरणे अयोग्य सामग्रीपासून बनविल्याचेही तपासणीत निदर्शनास आले.
तक्रारीनंतर समर्थ स्वीट्सची तपासणी करण्यात आली. या वेळी प्रवेशद्वाराजवळ उघडे गटार आणि कचरा आढळून आला. उत्पादन विभागात योग्य कार्यप्रवाह नसल्याने अन्न दूषित होण्याचा धोका असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले. उत्पादन विभागात वैयक्तिक वस्तू, कपडे तसेच अंथरूण-पांघरूणही आढळून आले.
हेही वाचा:स्टॉक रजिस्टर प्रकरणाने सावंतवाडी पालिकेत खळबळ; ‘मोठे मासे लपले आहेत’ नगरसेविकांचा आरोप
एकवीरा झुणका भाकर केंद्र आणि मनीषा स्वीट्सच्या उत्पादन विभागात गर्दी, अपुरे वायुवीजन आणि कीटक प्रतिबंधाची अपुरी व्यवस्था आढळली. अन्न तयार करण्याच्या जागेत धूळ आणि कीटकांचा संपर्क होण्याची शक्यता असल्याचेही तपासणीत आढळले.
नवाब सीख कॉर्नरच्या तपासणीत मुंग्या असलेला रवा साठवून ठेवलेला आढळला. तसेच कच्चे मांस उघडे ठेवण्यात आले होते. कच्चे, शिजवलेले आणि थेट खाण्यासाठी तयार अन्नपदार्थ योग्य पद्धतीने वेगळे ठेवलेले नव्हते. शीतकरण आणि साठवणुकीची जागाही अस्वच्छ असल्याचे आढळले. हॉटेल अश्विन आणि जय महाराष्ट्र मसाला डोसा कॉर्नर येथेही अन्नाची साठवणूक, तापमान नियंत्रण, स्वच्छता आणि कीटक नियंत्रणाबाबत त्रुटी आढळल्या. या सर्व बाबींची दखल घेत FDA ने संबंधित आस्थापनांवर कारवाई केली असून, अन्न सुरक्षा नियमांचे पालन करण्याबाबत प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.