
Nashik News: ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी; रस्त्यावरच्या पाईपवर दुचाकी आदळली अन् क्षणात तरुणाचा...
कृषी नगर परिसरात पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी रस्त्यावर पाईप आडव्या पद्धतीने ठेवण्यात आल्या होत्या. याच ठिकाणाहून दुचाकीवरून जात असताना सिद्धार्थ गोरे यांच्या दुचाकीची पाईपला धडक झाली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर सिद्धार्थ यांच्या कुटुंबीय आणि नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. पाइपलाइनचे काम सुरू असलेल्या ठिकाणी वाहनचालकांना सावध करण्यासाठी आवश्यक सुरक्षा फलक किंवा योग्य प्रतिबंधक व्यवस्था करण्यात आली नव्हती, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा दावा करत त्यांनी संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
या घटनेच्या निषेधार्थ सिद्धार्थ गोरे यांच्या नातेवाईकांनी त्यांचा मृतदेह नाशिक महापालिकेच्या मुख्यालयाबाहेर आणून आंदोलन केले. संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी आणि अपघाताला जबाबदार असलेल्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. नातेवाईकांनी केलेल्या आरोपांनंतर महापालिका प्रशासनाने आपली बाजू स्पष्ट केली आहे. पाइपलाइनचे काम सुरू असताना रस्त्यावर आडव्या ठेवण्यात आलेल्या पाईपवर रेडियम लावण्यात आले होते, असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.
महापालिका प्रशासनाच्या दाव्यानंतरही घटनास्थळी वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेली व्यवस्था पुरेशी होती का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. पाईप रस्त्यावर ठेवताना आवश्यक इशारा फलक, बॅरिकेडिंग आणि प्रकाशयोजनेसह अन्य सुरक्षा उपाय करण्यात आले होते का, याचीही चौकशी होण्याची गरज आहे. अपघात नेमका कोणत्या परिस्थितीत झाला आणि यासाठी कोणाची जबाबदारी निश्चित होते, याबाबत सध्या प्रश्न उपस्थित होत आहेत. संबंधित ठेकेदाराची निष्काळजीपणा होती की कामाच्या ठिकाणी पुरेशी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती, हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे.