

प्रेमसंबंधास नकार दिल्याच्या रागातून तरुणाला बेदम मारहाण.
लाकडी दांडक्याने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप.
एकलहरे परिसरातून फरार संशयित आकाश कांगुणेला अटक.
Nashik Road Crime News: प्रेमसंबंध ठेवायला नकार दिल्याचा राग मनात ठेवून एका तरुणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून जीवे मारायचा प्रयत्न केला. संशयिताला गुंडाविरोधी पथकाने पकडलं. आकाश अंबादास कांगुणे (वय २४, रा. आम्रपाली झोपडपट्टी, कॅनॉल रोड, नाशिकरोड) असं अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे. त्याला एकलहरे परिसरातून ताब्यात घेतलं.
फिर्यादी पूनम सौदे यांचा मुलगा यश याच्याशी परिसरात राहणारी एक महिला प्रेमसंबंध ठेवायला इच्छुक होती. यासाठी ती त्याला सारखी फोन करून संपर्क साधत होती. मात्र, यशने प्रेमसंबंध ठेवायला साफ नकार दिला. याचाच राग त्या महिलेने आणि तिच्या साथीदारांनी मनात धरला. याच रागातून ११ सप्टेंबर २०२६ रोजी गणेश कांगुणे, आकाश कांगुणे आणि इतरांसोबत ती महिला फिर्यादीच्या घरी गेली आणि तिथे वाद घातला.
वाद वाढत गेल्यावर आकाश कांगुणे याने यशला लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. त्याला जीवे मारायचा प्रयत्न केला, असा आरोप आहे. मारहाणीत यश गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणी १२ सप्टेंबरला गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून आकाश कांगुणे फरार होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. दरम्यान, गुन्ह्यातला फरार संशयित आकाश कांगुणे हा एकलहरे परिसरात असल्याची माहिती गुंडाविरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं. पुढच्या कारवाईसाठी त्याला उपनगर पोलिसांच्या स्वाधीन केलं.
गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी संदीप पवार, अंमलदार अक्षय गांगुर्डे व गणेश भागवत यांनी ही कारवाई केली. या प्रकरणात अजून कोण-कोण सहभागी होते, याचा पोलीस आता तपास करत आहेत.
पुणे: पुण्यातून एक विचित्र आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील रविवार पेठ परिसरात दागिने घडवण्याचे काम करणाऱ्या पश्चिम बंगाल येथील चार कर्मचाऱ्यांनी मालकालाच गंडा घातला. कर्मचाऱ्यांनी तब्बल ४२ लाख ९२ हजार रुपये किमतीचे सोने घेऊन पळ काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, फरार झालेल्या चौघा आरोपींचा शोध सुरू आहे.