Nitin Gadkari House Received Bomb Threat
Nitin Gadkari House Received Bomb Threat: नितीन गडकरी यांच्या वर्धा रोडवरील निवासस्थान एनरिको हाइट्सला रविवारी सकाळी ८:४६ वाजता बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. नागपूर पोलिस नियंत्रण कक्षाच्या ११२ क्रमांकाच्या आपत्कालीन क्रमांकावर अज्ञात व्यक्तीकडून फोनवरून ही धमकी देण्यात आली. नितीन गडकरी यांच्या घरावर बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्यानंतर पोलिसही अॅक्शन मोडवर आले आहे. फोन आल्यानंतर पोलिसांनी तातडीने यासंदर्भात तापस सुरू केला आहे. धमकी आल्यानंतर प्रताप नगर पोलिस ठाण्याला याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी गडकरी यांच्या निवासस्थानी पोहोचून झडती घेतली. मात्र, झडतीदरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.
झोन-१ चे डीसीपी ऋषिकेश रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी अज्ञात फोन करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. तसेच, पोलीसांकडून फोन करणाऱ्याचा अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. मंत्री नितीन गडकरी सध्या नागपुरात असून धमकीनंतर पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. तसेच, या घटनेचा तपास वेगाने केला जात आहे.
नेत्यांना अशा धमक्या मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेक व्हीव्हीआयपी व्यक्ती आणि ठिकाणांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. यापूर्वी १३ जुलै रोजी पोलिसांनी केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) चे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक केली होती. आरोपीने चिराग पासवान यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती. या प्रकरणाची चौकशी केली असता, आरोपीची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. मोहम्मद मेराज असे या तरूणाचे नाव होते. तो बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यातील भिधा गावचा रहिवासी आहे.
याशिवाय, २६ जुलै रोजी मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाली होती. तपासादरम्यान कोणतेही स्फोटके किंवा संशयास्पद वस्तू आढळल्या नाहीत. आज म्हणजेच ३ ऑगस्ट रोजी अयोध्या राम मंदिराला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, बीडमधील शिरूर कासार येथील एका तरुणाला सोशल मीडियाद्वारे धमक्या मिळाल्या आहेत.
शिरूर कासार परिसरात राहणाऱ्या एका तरुणाला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर राम मंदिराला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा मेसेज आला आहे. संदेश पाठवणाऱ्याने स्वतःची ओळख पाकिस्तानातील कराची येथील रहिवासी म्हणून करून दिली आहे आणि या दहशतवादी कटात तरुणांना सहभागी करून घेण्यासाठी त्याने १ लाख रुपये देण्याची ऑफरही दिली आहे.