सासवड: सासवडमध्ये घड्याळ चोरीच्या आरोपावरून अटक केलेल्या आरोपीकडून तब्बल आठ लॅपटॉप आणि नऊ मोबाईल संच जप्त केले आहेत. सासवड पोलिसांनी केलेल्या तपासात त्याने आपले कारनामे सांगितले आहेत. पुणे शहर आणि जिल्ह्याच्या विविध भागात चोऱ्या करून सासवड मधील साठेनगर मध्ये एका झोपडीत राहायचा तसेच चोरी केलेल्या वस्तू तामिळनाडू राज्यात नेवून विकत असे. त्यामुळेच चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लागत नव्हता. मात्र आरोपी मुद्देमालसह ताब्यात आल्याने अनेक मोठ्या गुन्ह्यांची उकल होणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक अर्जुन चोरगे यांनी सांगितले.
फिर्यादी वल्लकोंडा राजानरसिंमा रेडी,( जि वरंगल, तेलंगणा राज्य) हे १ जानेवारी रोजी सकाळी सासवड येथील संगमेश्वर मंदीरात दर्शनासाठी आले होते. दर्शन घेतल्यानंतर सासवड वरून हडपसरला जाणेसाठी सासवड येथील पीएमटी बसमध्ये बसले. तसेच टिकीट काढणेसाठी बॅग चेक केली असता, बॅगची चैन कोणीतरी उघडली असल्याचे लक्षात आले.
तसेच बॅगमध्ये अॅपल कंपनीचे घड्याळ व पाकीटातील क्रेडीट कार्ड आयकार्ड, पॅनकार्ड, डेबिटकार्ड आणि रोख २ हजार रुपये गेल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी तातडीने सासवड पोलिसांशी संपर्क साधला. तसेच त्यांचा मोबाईल घड्याळाशी कनेक्ट असल्याने त्यांनी लोकेशन तपासले असता सासवडमधील पुरंदर हायस्कूल जवळील एका झोपडीत दाखविले.
पोलिसांनी तिथे जावून पाहणी केली असता, गणेश मंजाप्पा, (वय ३० रा.घर नं.५२५ उदयराजा पालायम, जिल्हा अंबुर वेल्लोर तामिळनाडु) हा आरोपी आढळून आला. तसेच त्याने चोरलेल्या घड्याळासह तब्बल आठ लॅपटॉप आणि नऊ विविध कंपन्यांचे मोबाईल आढळून आले. त्यास अटक करून त्याच्याकडील सर्व वस्तू जप्त करण्यात आल्या. पोलीस कोठडी दरम्यान अधिक तपासात त्याने पोलिसांना चोरी करण्याचा फंडा पोलिसांना सांगितला. बिबवेवाडी,लोणीकाळभोर, लोणीकंद, बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध विभागातून वस्तू चोरल्याचे कबूल केले आहे. दरम्यान सासवड पोलिसांचा तपास पूर्ण झाल्याने आरोपीस सहकारनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अर्जुन चोरगे यांनी सांगितले.
शिरुरमध्ये एकाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून लुटले
पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पारोडी (ता. शिरुर) येथील एका डेअरीच्या ऑफिसची कडी वाजवली. दरवाजा उघडल्यानंतर चोरट्यांनी एकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून डेअरीच्या ऑफिस मधील साहित्यांचे नुकसान करत लाखोंची रोकड लांबवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिरुर पोलीस स्टेशन मध्ये तीन अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा: शिरुरमध्ये एकाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून लुटले; तब्बल लाखोंची रोकड लंपास
पारोडी (ता. शिरुर) येथे राहुल ढमढेरे यांची गगनगिरी मिल्क प्रोडक्ट नावाने डेअरी असून, सदर ऑफिसमध्ये राहुल यांचे वडील माणिकराव झोपलेले असताना रात्रीच्या सुमारास कोणीतरी कडी वाजवल्याने माणिकराव यांनी कडी उघडली असता तिघा अज्ञात चोरट्यांनी आतमध्ये येत माणिकराव यांना ढकलून देऊन त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून धक्काबुक्की केली, दरम्यान तिघांनी ऑफिस मधील साहित्यांची तोडफोड करत ऑफिस मध्ये ठेवलेली चार लाख एकोणीस हजार रुपयांची रक्कम घेऊन पोबारा केला.