पुणे: शहरात घरफोड्यांचे सत्र कायम असून, फुरसुंगी परिसरात चोरट्यांनी कुलूप बंद असलेले बार अँड रेस्टाँरट फोडून दारूच्या बाटल्या अन् रोकड चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. यासोबतच लोणीकंदमध्ये बंद फ्लॅट फोडण्यात आला असून, या दोन घटनांमध्ये साडे तीन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात रमेश वैद्य (वय ३४) यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञात चोरट्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तक्रारदार यांचे सासवड रस्त्यावरील गणेशनगर परिसरात वैद्य यांचे रेस्टाँरट अँड बार आहे.
दरम्यान, रविवारी नेहमी प्रमाणे बार बंदकरून रात्री ११ वाजता त्याला कुलूप गेले होते. यादरम्यान, अज्ञात चोरट्यांनी शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तसेच, आतमधील दारूच्या बाटल्या आणि रोकड असा एकूण १ लाख ८४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. तक्रारदारांना हा प्रकार दुसऱ्या दिवशी सकाळी साडे आकराच्या सुमारास लक्षात आला. नंतर त्यांनी पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली आहे. दुसऱ्या घटनेत लोणीकंद येथील वढू खुर्द येथील बंद घर फोडण्यात आले आहे. चोरट्यांनी कपाटातून १ लाख ७० हजार रुपयांची रोकड चोरून नेली आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात वंदना एडके यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास लोणीकंद पोलीस करत आहेत.
दहशत पसरविण्यासाठी पिस्तुल बाळगणारे गुन्हेगार जेरबंद
गुन्हेगारीतील क्रेझ तसेच परिसरात दहशत पसरविण्यासाठी अवैधरित्या पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगार व त्याच्या मित्राला थरारकरित्या सापळा लावून जेरबंद करण्यात आले. काळेपडळ पोलिसांनी ही कारवाई केली असून, त्यांनी हे पिस्तूल कोठून आणले, याबाबत तपास सुरू करण्यात आला आहे. रितेश बाबासाहेब कसबे (वय १८, रा. महंमदवाडी रोड, हडपसर) तसेच राहुल संजय चौधरी (वय २१, रा. हडपसर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अमित शेटे, पोलीस अंमलदार दाऊद सय्यद, अतुल पंधरकर व त्यांच्या पथकाने केली आहे.
हेही वाचा: दहशत पसरविण्यासाठी पिस्तुल बाळगणारे गुन्हेगार जेरबंद; 2 गावठी पिस्तुल अन् काडतुसे जप्त
४० तडीपार गुंडांना पोलिसांनी पकडले
निवडणुकीच्या काळात राजकीय पक्ष तसेच उमेदवारांकडून गुंडाचा वापर केला जात असल्याचा आरोप होत असतानाच पुण्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून जवळपास ४० तडीपार गुंडांना पुणे पोलिसांनी पकडले आहे. त्यात पुण्यात ऐन निवडणुकीच्या काळात अन् प्रचाराच्या धामधुमीत हे तडीपार गुंड शहरात हजेरी लावत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या आरोपींमध्ये तथ्य असल्याचे दिसते. राज्यभरात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. हे सुरू असतानाच राजकीय पक्ष तसेच उमेदवार गुंडांचा वापर करत असल्याचाही आरोप होत आहे. दरम्यान निवडणूकीत शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलिसांकडून सतर्कता बाळगत काम केले जात आहे. त्यामध्ये बेकायदा हत्यारे बाळगणाऱ्या गुंडांसह तडीपार गुंडावर नजर ठेवली जात असून, त्यांना चाप लावण्यात येत आहे.