औरंगजेबच्या समर्थनार्थ व्हॉट्सॲप स्टेटस ठेवणं तरुणाला भोवलं; पोलिसांना माहिती मिळताच...
बारामती : इन्स्टाग्राम स्टेटसला औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारा आक्षेपार्ह मजकूर ठेवणाऱ्यावर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली. अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार यांनी संबंधिताची 14 दिवसांसाठी येरवडा कारागृहात रवानगी केली.
औरगंजेबाचा फोटो स्टेटसला ठेवत त्यावर धार्मिक तेढ निर्माण होईल, असा आक्षेपार्ह मजकूर या व्यक्तीने ठेवला होता. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्या मोबाईलची तपासणी केली असता, त्यामध्ये औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारा फोटो व आक्षेपार्ह मजकूर आढळला. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विलास नाळे यांनी त्याच्याविरुद्ध प्रस्ताव तयार करून तो अतिरिक्त पोलिस अधीक्षक गणेश बिरादार यांना सादर केला.
दरम्यान, एसपी बिरादार यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच जामीनदार न दिल्याने सदर व्यक्तीची १४ दिवसांसाठी येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली. सध्या छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास तसेच मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे. या अनुषंगाने कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह स्टेटस किंवा अफवा पसरवणाऱ्या मजकुराचा संदेश सोशल मीडियावर शेअर करू नये, असे आवाहन बिरादार यांनी केले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अपर अधीक्षक बिरादार, उपविभागीय अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलिसांनी केली.
व्हॉट्सॲप स्टेटसवर बारकाईने लक्ष
कोणत्याही प्रकारचा धार्मिक तेढ निर्माण होणार नाही, याची खबरदारी प्रत्येकाने घेण्याची आवश्यकता आहे. सोशल मीडियावर तसेच व्हॉट्सॲप स्टेटसवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. अशाप्रकारे धार्मिक तेढ निर्माण करणारा मजकूर अथवा छायाचित्र आढळल्यास संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल.
अबू आझमी यांचे निलंबन
राज्याचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यामध्ये मोठी घडामोड घडत आहे. समाजवादी पक्षाचे नेते व मानखुर्द-शिवाजीनगरचे आमदार अबू आझमी यांचे विधानसभेतून निलंबन करण्यात आले आहे. आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचे कौतुक करणारे वक्तव्य केले होते. यामुळे सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी देखील जोरदार टीका केली होती. भाजप आमदार आणि मंत्री चंद्रकांत पाटील अबू आझमी यांना निलंबित करण्यात यावे असा प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव एकमताने मंजूर झाला आहे. त्यामुळे अबू आझमी हे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये निलंबित असणार आहेत. औरंगजेबाचे उदात्तीकरण प्रकरण हे अबू आझमी यांना भोवले आहेे.