
Pune Crime: आंतरधर्मीय विवाहाला विरोध;चेन्नईहून पुण्यात आलेल्या बापाने मुलगी-जावयाचे अपहरण केल्याचा आरोप
भारती विद्यापीठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ वर्षीय तरुणी मूळची उत्तर प्रदेशातील असून काही काळापासून चेन्नई येथे कुटुंबासोबत राहत होती. २८ वर्षीय तरुण हा उत्तर प्रदेशातील असून सुतारकाम करतो. दोघांची सोशल मीडियावर ओळख झाली. त्यानंतर दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबीयांचा विरोध असल्याने तरुणी सुमारे दहा दिवसांपूर्वी घरातून निघून पुण्यात आली आणि दोघांनी कायदेशीर विवाह केला. दरम्यान, तरुणी बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या वडिलांनी चेन्नई पोलिसांकडे केली. तिचा शोध घेतल्यानंतर ती पुण्यात असल्याची माहिती मिळाल्याने वडील, एक नातेवाईक आणि चेन्नई पोलीस दलातील एक कॉन्स्टेबल पुण्यात आले.
सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास आंबेगाव पठार येथील एका इमारतीखाली या तिघांनी जोडप्याला बोलावले. दोघे खाली येताच त्यांना पकडून हात-पाय बांधण्यात आले आणि कारमध्ये बसवून नेल्याचा आरोप आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर घरमालकाने पोलिसांना कळविले. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर अपहरणकर्ते जोडप्याला म्हाळुंगे परिसरातील एका लॉजवर घेऊन गेल्याचे समोर आले. तेथे तरुणाला मारहाण केल्याचा आरोप आहे. भारती विद्यापीठ पोलिसांचे पथक लॉजवर पोहोचण्यापूर्वीच संबंधितांनी जोडप्याला घेऊन साताऱ्याच्या दिशेने कारमधून निघून गेल्याचे पोलिसांच्या तपासात आढळले.
त्यानंतर पोलिसांनी कारचा पाठलाग सुरू केला. काही किलोमीटर पाठलाग केल्यानंतर खेड-शिवापूर टोलनाक्याजवळ कार अडवण्यात आली. पोलिसांनी तरुणी आणि तिच्या पतीची सुटका केली. तसेच तिचे वडील, नातेवाईक आणि चेन्नईतील पोलीस कॉन्स्टेबलला ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत तरुणीने पतीसोबतच राहण्याची इच्छा व्यक्त केल्याचे वरिष्ठ निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांनी सांगितले. दोघांनी आपण कायदेशीर वयात विवाह केला असल्याचे पोलिसांना सांगितले. दरम्यान, स्थानिक पोलिसांना माहिती न देता थेट जोडप्याच्या ठिकाणी जाणे, कथित मारहाण रोखण्यासाठी हस्तक्षेप न करणे आणि अपहरण करण्यात आलेल्या जोडप्यासोबतच कारमधून प्रवास करणे, या कारणांवरून चेन्नईतील कॉन्स्टेबलविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करीत आहेत.