सौजन्य फोटो - AI Gemini
प्रकाश चव्हाण हे कळंबा कारागृहात वरिष्ठ तुरुंगाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. १४ सप्टेंबर रोजी कारागृहातील सर्कल क्रमांक एकमधील बॅरेक क्रमांक तीन आणि चारमध्ये काही कैदी गोंधळ घालत होते. आरडाओरडा सुरू झाल्याने चव्हाण घटनास्थळी गेले. कारागृहातील शिस्त मोडू नका आणि दंगा करू नका, अशा सूचना त्यांनी कैद्यांना दिल्या. या घटनेनंतर कैद्यांमध्ये चव्हाण यांच्याबद्दल नाराजी निर्माण झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.
बुधवारी सकाळी सहा कैदी अचानक मंडल अधिकारी कार्यालयात घुसले. त्यांनी चव्हाण यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली आणि त्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी कैदी अल्ताफ शरीफ याने दगडाने चव्हाण यांच्या डोक्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हल्ला चुकवण्यासाठी चव्हाण यांनी डावा हात वर केला. त्यामुळे दगड त्यांच्या हाताला लागला आणि ते जखमी झाले. या प्रकारामुळे कारागृह प्रशासनात खळबळ उडाली. कारागृहातील अधिकाऱ्यावरच कैद्यांनी हल्ला केल्याने सुरक्षाव्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या घटनेनंतर संबंधित सहा कैद्यांना कळंबा कारागृहातून अन्य कारागृहात हलवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. कारागृह प्रशासनाने त्याबाबत प्रस्ताव तयार केला आहे. अल्ताफ शरीफ, भारत शेट्टी, विनायक चौगुले, आशुतोष वर्तले, आदम मुजावर आणि शाहिद मन्सूर यांना अमरावती, नागपूर किंवा येरवडा कारागृहात हलवण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर त्यांचे स्थलांतर केले जाणार आहे. दरम्यान, हल्ल्यामागील नेमकी कारणे, कैद्यांमध्ये झालेला वाद आणि कारागृहातील सुरक्षाव्यवस्थेबाबत पोलिस तसेच कारागृह प्रशासनाकडून पुढील तपास केला जात आहे.






