Pune Crime: पोलिसांनी जप्त केला अफुच्या बोंडाचा चुरा; आरोपीवर NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल
पुणे: हडपसर भागात अफुच्या बोंडाचा चुरा विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला गुन्हे शाखेच्या युनिट दोनने पकडले. त्याच्याकडून अफुच्या बोडांचा चुरा जप्त करण्यात आला. सुमेरलाल गिरीधारीलाल चौधरी (वय ३० सध्या रा. चिंतामणीनगर, हडपसर, मूळ रा. जोधपूर, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सहायक निरीक्षक आशिष कवठेकर, अमोल रसाळ, उपनिरीक्षक नितीन कांबळे, अमोल सरडे, संजय जाधव यांनी ही कारवाई केली. अमली पदार्थ तस्कारांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली आहे.
यादरम्यान, युनिट दोनचे पथक हद्दीत गस्त घालत होते. तेव्हा हडपसर भागातील सय्यदनगर परिसरात पोलीस कर्मचारी प्रमोद कोकणे, राहुल शिंदे गस्त घालत होते. त्यावेळी चौधरी दुचाकीवरुन तेथे आला होता. तो अफुच्या बोंडाचा चुरा विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने चौधरीला ताब्यात घेतले. त्याच्या दुचाकीची डिक्की पोलिसांनी उघडली. तेव्हा डिक्कीत अफुच्या बोंडाचा चुरा सापडला. अफुच्या बोंडाचा चुरा नशेसाठी वापरला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. चौधरीकडून दुचाकी, अफुच्या बोंडाचा चुरा असा ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, तब्बल 44 लाखांचे अमली पदार्थ जप्त
ड्रग्ज मुक्त सिटीचा संकल्प पुणे पोलिसांचा असला तरी तस्कर मात्र छुप्या पद्धतीने शहरात ड्रग्जचा पुरवठा करत असल्याचे दिसत असून, कात्रज भागात अमली पदार्थ बाळगणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून दोन किलो चरस, एक किलो गांजा असे ४३ लाख ८७ हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. तो हे अमली पदार्थ विक्री करण्यास आला असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
अरुण अशोक अरोरा (वय ५०, रा. प्रीतम हाईट्स, मांगडेवाडी, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकातील सहायक निरीक्षक नितीनकुमार नाईक, योगेश मांढरे, प्रशांत बोमादंडी, नितीन जगदाळे, आझाद पाटील, दिशा खेवलकर यांनी ही कारवाई केली.
हेही वाचा: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, तब्बल 44 लाखांचे अमली पदार्थ जप्त; एकाला अटक
गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना ठोकल्या बेड्या
दरम्यान गेल्या काही दिवसाखाली पुणे शहराच्या मध्यभागात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या दोन तरुणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्या दोघांकडून ८२० ग्रॅम गांजा जप्त केला असून, युनिट एकच्या पथकाने ही कारवाई शुक्रवार पेठेत केली आहे. समाधान केदा पवार (वय ३३, रा. नाशिक), संदीप सखाराम खैरनार (वय ३८, रा. पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक शब्बीर सय्यद, पोलीस अंमलदार सुजय रिसबुड व त्यांच्या पथकाने केली आहे.