संग्रहित फोटो
पुणे : ड्रग्ज मुक्त सिटीचा संकल्प पुणे पोलिसांचा असला तरी तस्कर मात्र छुप्या पद्धतीने शहरात ड्रग्जचा पुरवठा करत असल्याचे दिसत असून, कात्रज भागात अमली पदार्थ बाळगणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून दोन किलो चरस, एक किलो गांजा असे ४३ लाख ८७ हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. तो हे अमली पदार्थ विक्री करण्यास आला असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
अरुण अशोक अरोरा (वय ५०, रा. प्रीतम हाईट्स, मांगडेवाडी, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकातील सहायक निरीक्षक नितीनकुमार नाईक, योगेश मांढरे, प्रशांत बोमादंडी, नितीन जगदाळे, आझाद पाटील, दिशा खेवलकर यांनी ही कारवाई केली.
शहरात एका २० वर्षीय तरुणाने पंधरा दिवसात पाच लाखांचे अमली पदार्थाचे सेवन केल्याची धक्कादायक बाब स्पष्ट झाल्यानंतर त्याला हे अमली पदार्थ पुण्यातूनच मिळाल्याचेही समोर आले होते. त्यामुळे पोलिसांकडून पुन्हा ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्यांकडे मोर्चा वळवला होता. दरम्यान, अमली पदार्थ विरोधी पथक कात्रज भागात गस्त घालत होते. तेव्हा अरुण अरोरा याच्याकडे मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला.
अरोरा याच्याकडून दोन किलो १४० ग्रॅम चरस, एक किलो ७९० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांची किंमत ४३ लाख ८७ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अरोराने अमली पदार्थ कोणाकडून आणले तसेच कोणाला विक्री करण्याच्या तयारीत होता?, यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
हे सुद्धा वाचा : पुणे हादरलं! दांडक्याने बेदम मारहाण करुन तरुणाचा खून, कारण काय तर…
गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना ठोकल्या बेड्या
दरम्यान गेल्या काही दिवसाखाली पुणे शहराच्या मध्यभागात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या दोन तरुणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्या दोघांकडून ८२० ग्रॅम गांजा जप्त केला असून, युनिट एकच्या पथकाने ही कारवाई शुक्रवार पेठेत केली आहे. समाधान केदा पवार (वय ३३, रा. नाशिक), संदीप सखाराम खैरनार (वय ३८, रा. पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक शब्बीर सय्यद, पोलीस अंमलदार सुजय रिसबुड व त्यांच्या पथकाने केली आहे.