
Pune Land Scam Sheetal Tejawani:
Parth Pawar Pune Land Scam Sheetal Tejawani: पुण्यातील कोरेगाव पार्क येथील ४० एकर भूखंड घोटाळा प्रकरणामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि मामेभाऊ दिग्विजय पाटील यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आली आहे. पार्थ पवार आणि भागीदार असलेले दिग्विजय पाटील यांच्या अमेडिया कंपनी मार्फत हा जमीन व्यवहार कऱण्यात आला होता. पण यात गंभीर गैरव्यवहार आणि शासकीय नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे राज्यात राजकारण तापलं असतानाच एक मोठी अपडेट समोर आली आहे.
पार्थ पवार यांच्याशी या जमिनीचा व्यवहार करणारी शीतल तेजवानी सध्या फरार असल्याची माहिती समोर आली आहे. कोरेगाव पार्क आणि बोपोडी येथील जमीन घोटाळ्यांची मास्टरमाईंच असलेली शीतल तेजवानीविरुद्ध दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.त्यातच तिचा फोनही बंद असून ती राहत्या पत्त्यावरही आढळून आलेली नाही. शीतल तेजवानी नवऱ्यासोबत परदेशात पळून गेल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. त्या अनुषंगाने बावधन पोलिसांनी इमिग्रेशन विभागाकडून माहिती मागवण्याची तयारी सुरू केली आहे.
कोण आहे शीतल तेजवानी?
शीतल तेजवानी आणि सागर तेजवानी हे दांपत्य सेवा विकास बँकेतील तब्बल ६० कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्यात अडकल्याचे समोर आले आहे. सागर सूर्यवंशी (पूर्वी तेजवानी) यांनी पत्नी शीतल तेजवानी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे एकूण ४१ कोटी रुपयांची १० कर्जे घेतली. या सर्व कर्जांसाठी बनावट कागदपत्रे सादर करण्यात आली होती. ही कर्जे सेवा विकास बँकेच्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड शाखांमधून उचलण्यात आली.
Explainer: बिहारचे मतदान वाढल्यामुळे NDA, महाआघाडी सर्वच खुष, कारण वाचून तुमचंही डोकं गरगरेल;
कर्ज घेण्याचे कारण दाखवून देण्यात आलेल्या व्यवसायांमध्ये ती रक्कम वापरली न जाता इतर वैयक्तिक आणि व्यावसायिक कामकाजात खर्च करण्यात आली. या संदर्भातील प्राथमिक ऑडिट २०१९ मध्ये सहकार सह आयुक्त राजेश जाधवर यांनी केल्यानंतर हा गैरव्यवहार उघडकीस आला. सागर आणि शीतल यांनी घेतलेली कर्जे मुद्दाम न फेडल्यामुळे, ३१ मार्च २०२१ पर्यंत ही रक्कम ६० कोटी रुपयांवर पोहोचली.
यानंतर जानेवारी २०२३ मध्ये ईडीने सागर सूर्यवंशीच्या घर व कार्यालयावर छापे टाकले. मे २०२३ मध्ये स्पेशल कोर्टात खटला दाखल करण्यात आला असून सागर सूर्यवंशीच्या ४५ कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या. या प्रकरणात ऑक्टोबर २०२१ मध्ये प्रथम सीआयडीने आणि नंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सागर सूर्यवंशीला अटक केली होती. जामिनावर सुटताच, जून २०२३ मध्ये ईडीने पुन्हा त्याला अटक केली.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया होल्डिंग्ज एलएलपी या कंपनीवर मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप झाले आहेत. सुमारे १८०४ कोटी रुपये बाजारभाव असलेली जमीन केवळ ३०० कोटींना खरेदी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या व्यवहारानंतर केवळ दोन दिवसांतच स्टॅम्प ड्युटी माफ करण्याचे आदेश देण्यात आल्याचाही दावा करण्यात आला आहे. नियमानुसार या खरेदीवर सुमारे २१ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क भरावे लागले असताना, फक्त ५०० रुपयांवर व्यवहार पूर्ण झाल्याचे समोर आले आहे. विरोधकांनी या प्रकरणावर टीकेची झोड उठवत सरकारवर “प्रशासनाचा गैरवापर करून जमीन व्यवहार कायदेशीर ठरवण्याचा प्रयत्न” झाल्याचा आरोप केला आहे. अमेडिया होल्डिंग्ज एलएलपीमध्ये पार्थ पवार यांची ९९ टक्के भागीदारी असल्याने ते थेट वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.