अजित पवार- पार्थ पवारांचे टेन्शन वाढणार; पुण्यातील जमीन घोटाळाप्रकरणात फडणवीसांच्या सूचक वक्तव्य
Parth Pawar News: पुण्यातील कोरेगाव पार्क जमीन घोटाळ्याच्या प्रकरणावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या गैरव्यवहारात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचे नाव आल्याने विरोधकांनी सत्ताधारी महायुती सरकारवर टीका करण्यास सुरूवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत.त्यामुळे या प्रकरणावरून महायुतीत नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
“या प्रकरणात दोन्ही पक्षांनी संबंधित रजिस्ट्री रद्द करण्यासाठी अर्ज केला आहे. मात्र, त्यामुळे दाखल गुन्हेगारी प्रकरण संपणार नाही. तपासादरम्यान ज्या अनियमितता आढळतील, त्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. माझ्या या मताशी श्रीमान उपमुख्यमंत्री अजित पवार देखील पूर्णपणे सहमत असतील. अहवालात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई होईलच,’असे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या वक्तव्यानंतर बोपोडी जमीन प्रकरणावर पुढील घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.
Maharashtra Rain alert: महाराष्ट्रावर नव्या संकटाची चाहूल! पुढचे २४ तास अतिमहत्त्वाचे!
एकीकडे फडणवीसांनी कारवाईचे संकेत दिले असताना दुसरीकडे मात्र भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखेपाटील यांनी यांनी अजित पवार यांची पाठराखण केली आहे. अजित पवारांनी तेव्हाच थांबवल असतं तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती, पण बऱ्याचदा कामाच्या व्यापात अशा गोष्टी राहून जातात.अनेक निर्णय परस्पर घेतले जात. पण आता मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत, त्यानुसार त्यांची चौकशी होऊन द्यावी. पण अजित पवार यांचा राजीनामा मागण्यात काहीही अर्थ नाही. विरोधकांना एकच काम आहे, काही झालं की राजीनामा मागतात, राजीनामा मागण्यापेक्षा चौकशीनंतर जे वास्तव समोर येईल, तेव्हा जे मागायचं आहे ते मागा, असा टोलाही विखेपाटील यांनी विरोधकांना लगावला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणात अजित पवार यांनी त्यांच्या एका वक्तव्यावरून यु-टर्न घेतला आहे. जमीन घोटाळ्याचे प्रकरण उजेडात आल्यानंतर ६ नोव्हेंबरला अजित पवार यांनी, माझा त्या गोष्टीची दुरान्वये संबंध नाही. मागे तीन -चार महिन्यांपूर्वी मला या गोष्टी कानावर आल्या होत्या, पण असं काहीही चुकीचं केलेल मला चालणार नाही, अशा चुकीच्या गोष्टी करून नका, असंमी स्पष्टपणे त्यांना सांगितले होते. अस अजित पवार यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर अजित पवारांना या जमीन गैरव्यवहाराची आधीपासूनच माहिती होती. अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. पण दुसऱ्याच दिवशी अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना या वक्तव्यावरून माघार घेतली. “आजपर्यंतच्या ३५ वर्षांच्या कार्यकाळात मी राजकीय जीवनात कधीही नियम सोडून काम केलं नाही. २००९-१० मध्येही माझ्यावर आरोप झाले होते. पण ते आरोप सिद्ध झाले नाहीत.’ असंही त्यांनी नमुद केलं.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया होल्डिंग्ज एलएलपी या कंपनीवर मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप झाले आहेत. सुमारे १८०४ कोटी रुपये बाजारभाव असलेली जमीन केवळ ३०० कोटींना खरेदी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या व्यवहारानंतर केवळ दोन दिवसांतच स्टॅम्प ड्युटी माफ करण्याचे आदेश देण्यात आल्याचाही दावा करण्यात आला आहे. नियमानुसार या खरेदीवर सुमारे २१ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क भरावे लागले असताना, फक्त ५०० रुपयांवर व्यवहार पूर्ण झाल्याचे समोर आले आहे. विरोधकांनी या प्रकरणावर टीकेची झोड उठवत सरकारवर “प्रशासनाचा गैरवापर करून जमीन व्यवहार कायदेशीर ठरवण्याचा प्रयत्न” झाल्याचा आरोप केला आहे. अमेडिया होल्डिंग्ज एलएलपीमध्ये पार्थ पवार यांची ९९ टक्के भागीदारी असल्याने ते थेट वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.






