पुणे: पुण्याच्या मध्यभागातून एका सराईताला पकडून पुणे पोलिसांनी नंतरच्या तपासातून एक आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट उघड केलेले असताना आता नाना पेठेतून मॅफेड्रॉन (एमडी) हा अमली पदार्थ विकण्यास आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. छापेमारीत त्यांच्याकडून तब्बल ११ लाख ४० हजारांचे एमडीसह इतर असा १३ लाख ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अदीब बशीर शेख (२९, रा. नाना पेठ), यासीर हशीर सय्यद (३०, रा. कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शहरात ड्रग्ज सप्लायरचे जाळे मोठ्याप्रमाणात वाढले आहे. या सप्लायरवर पुणे पोलिसांची नजर असली तरी ग्राहकांपर्यंत ड्रग्ज पोहच होत असल्याचेही दिसून आलेले आहे. यापार्श्वभूमीवर अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथक हद्दीत गस्त व पेट्रोलिंग करत होते.
त्यादरम्यान नाना पेठ भागात दोघेजण थांबले असून त्यांच्याकडे एमडी असल्याची माहिती पथकाला मिळाली. यानूसार, पथकाने परिसरात सापळा रचला. तसेच, संशयित दोघे दिसताच पथकाने शेख, आणि सय्यद या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता एमडी आढळून आले. दोघांवर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक निरीक्षक नितीनकुमार नाईक, अंमलदार आझाद पाटील, मयूर सुर्यवंशी, साहिल शेख यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.
सायबर चोरट्यांकडून महिलेची फसवणूक
ऑनलाईन टास्कच्या आमिषाने महिलेची सायबर चोरट्यांनी ३१ लाख ६५ हजार रुपांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांवर विमानतळ पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ४१ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार विमाननगर भागात राहतात. गेल्या वर्षी जून महिन्यात महिलेला चोरट्यांनी मॅसेज पाठवून त्याद्वारे ऑनलाईन टास्कची माहिती दिली होती. घरबसल्या कामाची संधी असे आमिष दाखविले होते. सुरुवातीला चोरट्यांनी एक काम दिले. या कामाचे पैसेही दिले. त्यामुळे महिलेचा विश्वास बसला.
Pune Crime : सायबर चोरट्यांकडून महिलेची फसवणूक; तब्बल ३१ लाखांना घातला गंडा
नंतर मात्र ऑनलाइन टास्क या व्यवसायात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगत जाळ्यात ओढले. यानंतर महिलेला वेळोवेळी बँक खात्यात ३१ लाख ६५ हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी परतावा दिला नाही. महिलेने रक्कम परत करण्यास मोबाइलवर संपर्क साधला. तेव्हा चोरट्यांनी त्यांचे मोबाइल बंद केल्याचे लक्षात आले. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. गु्न्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक आशालता खापरे तपास करत आहेत.