
सांगली जिल्हा बँकेवर दरोडा टाकणारे दरोडेखोर अखेर सापडले; सव्वा तीन कोटींचा मारला होता डल्ला
आटपाडी : झरे (ता. आटपाडी) येथील जिल्हा बँकेतील चोरीचा गुन्हा उघड झाला आहे. सव्वा तीन कोटींच्या मुद्देमालासह चार आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. सांगली गुन्हे अन्वेषण विभागाने ही कामगिरी केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, अज्ञातांनी झरे (ता.आटपाडी) येथील जिल्हा बँकेच्या शाखेत ७ जानेवारी रोजी मध्यरात्री खिडकीतून प्रवेश करून बँकेच्या स्ट्रॉंग रूममधील लॉकरचे 22 कप्पे फोडून कोट्यवधींचा ऐवस लंपास केला होता. चोरी करत असताना त्यांनी हातमोजे वापर करून बँकेतील सीसीटीव्ही व डीव्हीआर ताब्यात घेतला होता. त्यामुळे सदरच्या चोरीचा तपास करणे पोलिसांपुढे आव्हान बनले होते. या घटनेमुळे बँकिंग क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती.
त्यानंतर पोलिसांनी तपासासाठी वेगवेगळी यंत्रणा कार्यरत केली होती. त्यानुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सांगली यांच्याकडील अधिकाऱ्यांना खास गोपनीय बातमीदाराकडून पलुस येथील लॉजवर काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील काही इसम राहण्यास आले असल्याचे समजले.
हेदेखील वाचा : Nagpur Crime: नागपुरात एकाच दिवशी दोन हत्या! नकारातून तरुणीचा खून, रामझुला पुलाखाली अज्ञात तरुणाची निर्घृण हत्या
याबाबत अधिक चौकशी केली असता विश्वजित विजय पाटील (रा.बांबवडे) याचे उत्तर प्रदेश येथे गलाई दुकान असल्याने त्याच्या ओळखीने राहुल शर्मा आपल्या अन्य साथीदारांसह याठिकाणी आला होता. त्यांनी संकेत अरुण जाधव (रा.बलवडी) आणि इजाज राजू आतार (रा.अमरापूर) यांच्याकडून चोरीसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध केले असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज पवार यांनी एक पथक तयार करून उत्तर प्रदेश गाठले. त्या ठिकाणी संशयित आरोपी राहुल शर्मा हा ककराळा बधायु येथे १९ जानेवारी रोजी आल्याचे समजले. यावेळी त्याला स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले असता त्याने साथीदारांच्या मदतीने झरे येथील बँकेत केलेल्या चोरीतील सोन्याची लगड पोलिसांपुढे हजर केली. त्यानंतर आरोपीसह पोलीस पथक सांगलीकडे रवाना झाले.
सोन्यासह चांदीचे दागिनेही मिळाले
जयदीप केळकर यांच्या पथकास गोपनीय माहितीदाराकडून बँक चोरीतील आरोपी सोने विकण्यासाठी सांगलीवाडी येथे येणार असल्याचे समजले. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून स्कार्पिओ गाडीसह चार संशयतांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता गाडीमध्ये चांदीचे दागिने, गॅस बाटला मिळून आला. त्यामुळे अधिक चौकशीत त्यांनी झरे येथील चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपींना पोलिसांनी केली अटक
पोलिसांनी या प्रकरणात राहुल रंजमीश शर्मा (वय 27, रा.उत्तर प्रदेश), संकेत अरुण जाधव (वय 26, रा. बलवडी), इजाज राजू आतार (वय 30, रा. अमनापुर) यांना अटक केली. त्यांच्याकडून सोन्याची लगड, चांदीचे दागिने, 503 ग्रॅम सोन्याचे दागिने, महिंद्रा स्कार्पिओ गाडी, एक बनावट पिस्तूल व चार राऊंड, एक ऑक्सिजन बाटला व पाच किलो वजनाचा गॅस सिलेंडर तसेच रोख रक्कम रुपये 51 हजार 600 असा मिळून 3,२५,५४,६०० रुपये किमतीचा ऐवज हस्तगत केला आहे. सदरच्या चोरीचा तपास जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे व अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केला.