Karad Firing Case : कराडमधील गोळीबारप्रकरणी मोठी अपडेट; आता आरोपीला...
कराड : एक मोठी बातमी समोर आली आहे. सैदापूर (कराड) येथील अक्षरा रेसिडन्सीमध्ये पार्किंगच्या कारणावरून एका कुटुंबावर गोळीबार केल्याची घटना घडली होती. यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारास न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सुरेश काळे (वय ३८, मूळ रा. तळबीड, सध्या सैदापूर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या प्रदीप घोलप व त्यांच्या लहान मुलीच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, सैदापूर येथील होली फॅमिली स्कूलच्या मागील बाजूस ओम कॉलनीतील अक्षरा गृहनिर्माण सोसायटीत काल रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाला होता. त्या सोसायटीचे अध्यक्ष प्रदीप घोलप यांच्या गरात घुसून गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणी संशयीत सुरेश काळे याला पोलिसांनी अटक केली. या हल्ल्यात घोलप यांच्यासह त्यांची दहा वर्षांची मुलगी जखमी झाली. त्यांच्यावर कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दोघांच्याही प्रकृतीत सुधारणा होत आहे.
गावठी कट्टा व १६ जिवंत काडतुसे जप्त
घोलप त्या सोसायाटीत बारा वर्षांपासून राहत आहेत. तर पाच वर्षांपासून त्याच सोसायटीत संशयीत काळे राहतो आहे. काळे इमारतीत पहिल्या मजल्यावर व घोलप तिसऱ्या मजल्यावर राहतात. त्यांच्यात पार्कींगमध्ये दुचाकी लावण्यावरून वाद झाला. त्याचे पर्यावसन गोळीबारीत झाले. गोळीबार झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच पोलिस घटनास्थळी पोहचले. त्यांनी संशयित सुरेश काळे याला अटक केली. त्यांच्याकडून गावठी कट्टा व १६ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. काळेवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हाही दाखल आहे. या प्रकरणात वाहन पार्कींगच की इतर काही कारण आहे का? याचा पोलीस तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा : बसमध्ये अश्लील व्हिडिओ दाखवून अल्पवयीन मुलीची छेड; बार्शीतील संतापजनक प्रकार
राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले
राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसाखाली छत्रपती संभाजीनगरमध्ये जुन्या भांडणाच्या कारणातून 26 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. ही घटना सोमवारी (दि.2) सायंकाळी हसूल परिसरातील कारागृहाच्या बाजूच्या मैदानावर घडली. दिनेश उर्फ बबलू परमानंद मोरे (वय 26, रा. चेतनानगर, हसूल) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी अनिकेत गायकवाड व गणेश सोनवणे यांची नावे समोर आली असून, शोधासाठी चार पथके रवाना झाली. या हत्येप्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.