
Pune News: केतनचा हात-पाय मोडून अपंग करण्याचा होता प्लॅन; डिलीट केलेल्या चॅटमधून पोलिसांच्या हाती महत्त्वाचे पुरावे
डिलीट केलेल्या चॅटमधून कटाचा उलगडा
केतनच्या हत्येची तयारी सुरू असताना रितेश, चेतन आणि सिया यांच्यात झालेली चर्चा कोडवर्डमध्ये नव्हती, तर स्पष्ट शब्दांत होती. गुन्ह्यापूर्वी तिघांनीही मोबाईलमधील चॅट डिलीट केली होती. मात्र, फॉरेन्सिक तपासाच्या मदतीने पोलिसांनी हा डेटा रिकव्हर केला. त्यातून हत्येच्या कटासंदर्भातील महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली. तपासात रितेशला केतनच्या हत्येच्या कटाची आधीपासून माहिती असल्याचे समोर आले आहे. एवढेच नव्हे, तर हत्येनंतर चेतनने रितेशची भेट घेतल्याची माहितीही पोलिसांना मिळाली आहे.
रितेशकडून अपूर्ण माहिती?
रितेश आणि चेतन हे कॉलेजपासूनचे मित्र आहेत. चेतनने केतनच्या हत्येशी संबंधित विविध माहिती रितेशसोबत शेअर केली होती. मात्र, कटाची माहिती असूनही रितेशने ती पोलिसांना कळवली नसल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सध्या तो पोलिसांना अपूर्ण माहिती देत असल्याचा संशय असून, त्याची कसून चौकशी सुरू आहे. घटना घडली त्यावेळी रितेश लोहगडावर उपस्थित होता का, याचाही तपास पोलिस करत आहेत. रितेश मूळचा बीड जिल्ह्यातील असून सध्या पुण्यातील बालेवाडी परिसरात एका खासगी कंपनीत नोकरी करत असल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा: पूर्ववैमनस्यातून सराईत गुंडाची हत्या; दारू पाजून धारदार शस्त्रांनी तब्बल 24 वार केले अन्…
सिया आणि चेतन न्यायालयीन कोठडीत
केतन अग्रवालचा १८ जून रोजी लोहगड किल्ल्यावरून दरीत पडून मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा अपघात असल्याचे मानले जात होते. मात्र, पोलिस तपासात हा अपघात नसून हत्या असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना यापूर्वीच अटक झाली असून, दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आता रितेश हिंगेच्या अटकेमुळे हत्येच्या कटातील त्याची नेमकी भूमिका काय होती, तसेच आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत तपासाला वेग आला आहे. रितेशच्या चौकशीतून या प्रकरणातील आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.