
'मानसशास्त्रीय' पद्धतीने केतनच्या खुनाचा उलगडा, पासपोर्ट अन् हुडीने दाखवली दिशा; पोलिसी खाक्याचा वापर नाही
पुणे : महाराष्ट्रातील हायप्रोफाईल तसेच ‘कोल्ड ब्लडेड मर्डर’ ठरलेल्या केतन अग्रवाल खुनाचा पुणे ग्रामीण पोलिसांनी ‘मानसशास्त्रीय’ पद्धत वापरून उलगडा केला आहे. मुख्यत: पारंपारिक पोलिसी खाक्या, तांत्रिक विश्लेषण तसेच खबऱ्यांद्वारे खुनाचा गुन्हा उघडकीस आणला जातो. पण, अग्रवाल खून याला अपवाद ठरला आहे. आरोपींचे वर्तनाचा अभ्यास, त्यांच्या प्रतिक्रियांचे निरीक्षण व विश्वासाचे वातावरण निर्माण करून प्रश्न विचारले गेले. या चौकशीदरम्यान दोघे पोलिसांपुढे बोलते झाले आणि या नियोजनबद्ध हत्येचा संपूर्ण कट उघड झाला. गुरूवारी सिया तसेच चेतन यांनी पुण्यातील लुल्लानगर भागात ज्या ठिकाणी केतनला ढकलून देण्याचा सराव केला, त्याचा पंचनामाही करण्यात आला. त्यासोबतच घराची झडती व पंचनामा करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
पासपोर्ट प्रकरण आणि हुडीने संशय गडद
केतन अग्रवाल याचा सेल्फी काढताना दरीत पडून मृत्यू झाल्याची कथा रचण्यात आली होती. पण, हा कोल्ड ब्लडेड मर्डर असल्याचे पुणे ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणले. याप्रकरणात होणारी पत्नी सिया गोयल तसेच चेतन चौधरी यांना अटक केली. या प्रकरणात आकस्मात मृत्यू नोंदीवरून तपास सुरू केला. घटनास्थळाची पाहणी, तसेच बाली येथे जाताना मुंबईत पासपोर्ट गहाळ झाल्याची माहिती पोलिस अधीक्षक संदिपसिंह गिल यांना समजली. त्यांना घटनेबाबत संशय आल्याने येथे असलेले सीसीटीव्ही पडताळले. तेव्हा या दोघांच्या पाठिमागून कडक उन्हात हुडी घालून एकजण आल्याचे तसेच सिया व त्याच्यात काही इशारे झाल्याचे दिसून आल्याने त्यांना संशय आला.
दोघांचीही कसे बोलायचे याची पूर्वतयारी!
दोघांना ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवून दिली. मात्र, हायप्रोफाईल असलेल्या या खूनातील दोघांकडे पोलिसी खाक्या दाखवून तपास करणे शक्य नव्हते. दोघांनीही पोलिस आपल्यापर्यंत आल्यानंतर काय करायचे, याची पुर्वतयारी केली होती. त्यामुळे पोलिसांनी दोघांकडे स्वतंत्रपणे चौकशी केली व त्यांना प्रश्नही विचारले. विशेष म्हणजे, वेगवेगळ्या चौकशीतही त्यांच्या उत्तरांमध्ये जवळपास एकसारखेपणा आढळला.
नंतर पोलिसांनी मानसशास्त्रीय पद्धतीने चौकशीला सुरूवात केली. जवळपास ८-८ तास दोघांकडे केलेल्या चौकशीनंतर हा खून केल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचा हावभाव, बोलण्याची शैली आणि मानसिक प्रतिक्रियांचा अभ्यास करत विचारलेल्या प्रश्नांमुळे दोघांचाही हा बनाव उघड झाला. आरोपींनी अत्यंत कोल्ड ब्लडेड पद्धतीने व नियोजनबद्ध हा खून केल्याचे समोर आले. केतनच्या खूनाची माहिती कोणाला कळू नये आणि गुन्ह्यात तिसऱ्या व्यक्तीचा सहभाग राहू नये, यासाठी सुपारी न देता स्वतःच खून केल्याचे समोर आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.