
१५ शहरं, पोलिसांची ३५ पथकं; सैफवरील हल्लेखोराच्या ७२ तासात कशा आवळल्या मुसक्या?
मुंबई : अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करणाऱ्या संशयिताला छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. या हल्लेखोराचा देशभरात शोध घेण्यात येत होता. मुंबई ते कोलकाता दरम्यान धावणाऱ्या शालीमार-ज्ञानेश्वरी एक्सप्रेसमधून त्याला पकडण्यात आले. तो दुर्ग आरपीएफच्या ताब्यात आहे. संशयिताचे नाव आकाश असून, आरपीएफ दुर्गने मुंबई पोलिसांना कळवले आहे. मुंबई पोलिस छत्तीसगडला पोहोचल्यानंतरच अधिक माहिती उपलब्ध होईल, असे आरपीएफ निरीक्षक संजीव सिन्हा यांनी सांगितले.
16 जानेवारीच्या पहाटे बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाला होता. या प्रकरणात, पोलिसांनी डेटा डंप तंत्राद्वारे हल्लेखोराची ओळख पटवली. पोलिसांनी घटनास्थळाभोवती असलेल्या मोबाईल टॉवर्सवरून सक्रिय फोनची माहिती गोळा केली. या डेटाचे विश्लेषण करून, घटनेच्या वेळी परिसरात कोण उपस्थित होते हे उघड झाले. यामुळे हल्लेखोराचा माग काढण्यास मदत झाली. तंत्रज्ञानाच्या वापरामुळेही मोठे यश मिळाले आहे. आरोपी छत्तीसगडमधील जांजगीर चंपा येथील त्याच्या एका नातेवाईकाच्या घरी जात होता, अशी माहिती मिळत आहे.
जुहू पोलिसांना मिळाली होती माहिती
जुहू पोलिस स्टेशनला माहिती मिळाली होती की, सैफ अली खान हल्ला प्रकरणातील एक संशयित ज्ञानेश्वरी एक्सप्रेसने प्रवास करत आहे. त्यानंतर संशयिताचा फोटो पाठवण्यात आला. यानंतर दुर्ग स्थानकावर दोन पथके तयार करण्यात आली. रेल्वे दुर्गला पोहोचली तेव्हा संशयिताला ताब्यात घेतले.
सैफवर सहा वार
गुरुवारी पहाटे सैफ अली खानवर त्याच्या घरात चोरट्याने हल्ला केला होता. चोर काही तासांपूर्वी घरात घुसला होता. जेव्हा सैफच्या मोलकरणीने चोराला पाहिले तेव्हा तिने अलार्म वाजवला. परिस्थिती हाताळण्यासाठी सैफ अली खान पोहोचला, पण चोराने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. यादरम्यान सैफवर सहा वेळा चाकूने वार करण्यात आले. वैद्यकीय अहवालांनुसार, त्याच्या पाठीच्या कण्यापासून चाकूचा 2.5 इंचाचा भाग काढून टाकण्यात आला. सध्या सैफ अली खानची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.