पुणे: येरवड्यातील सादलबाबा चौक परिसरात पहाटे तरुणाला कोयत्याच्या धाकाने लुटल्याची घटना घडली. तरुणाचा २५ हजार रुपये किंमतीचा मोबाईल आणि १ हजार ६५० रुपयांची रोकड असा ऐवज चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेला. याप्रकरणी गेसुराज जगन्नाथ पाटील (वय २१, रा.जयजवान नगर येरवडा) याने तक्रार दिली आहे. त्यानुसार येरवडा पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार तरुण पहाटेच्या वेळी घरातून कामावर जाण्यासाठी निघाला होता. त्यावेळी दुचाकीवरून दोघे आरोपी आले. त्यांनी तरुणाला सादलबाब चौकाच्या परिसरात गाठले. त्याचा मोबाईल हिसकावून घेतला. तसेच अॅपमधून पैसे काढून घेतले. अधिक तपास सहायक निरीक्षक साळुंके करीत आहेत.
सराफी पेढीतून ३ लाखांचे दागिने चोरले
खरेदीच्या निमित्ताने सराफी दुकानात आलेल्या जोडप्याने ३ लाख रुपये किंमतीचे दागिणे चोरून पोबारा केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी धनकवडी येथील ३६ वर्षीय व्यवसायिकाने तक्रार दिली आहे. त्यानुसार सहकारनगर पोलिसांनी एक अनोळखी महिला आणि पुरूष अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे सातारा रोडवर सराफी दुकान आहे. मंगळवारी (दि २६) सकाळी पावने बारा वाजण्याच्या सुमारास एक महिला व एक पुरूष खरेदीच्या निमित्ताने दुकानात आले. दरम्यान, त्यांनी बोलण्यात गुंतवून तीन लाख रुपये किंमतीचा सोन्याचा नेकलेस काऊंटरमधून चोरी केला. पुढील तपास सहायक निरीक्षक सागर पाटील करत आहेत.
हेही वाचा: Pune Crime News: ज्वेलर्सच्या दुकानात खरेदीला गेले, गळ्यात सोनसाखळी घातली अन् थेट…
शहरात सराफी दुकानात खरेदीच्या निमित्ताने येऊन दागिने चोरीच्या घटना वाढीस लागल्या असून, सिंहगड रोड येथे पुन्हा दोन घटना घडल्या आहेत. धायरी येथील ओम ज्वेलर्स आणि वडगाव बुद्रुक येथील भाग्यलक्ष्मी ज्वेलर्सच्या दुकानात या घटना घडल्या आहेत. चोरटे दुकानात आले आणि सोन साखळी पाहण्यास मागून त्या गळ्यात घालून दुचाकीवर धूम ठोकल्याचा प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणी सिंहगडरोड पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हा प्रकार 26 नोव्हेंबर रोजी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबत दिपक वसंत पवार (32, रा. दिपाली अपार्टमेंट, शाश्वत नगर, नर्हे) यांनी सिंहगडरोड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. यावेळी चोरट्याने 1 लाख 18 हजार रूपये किंमतीच्या दोन सोनसाखळ्या चोरी करून नेल्या.
घटनेच्या दिवशी एक जण ओम ज्वेलर्स दुकानात शिरला. त्याने वाढदिवस 30 तारखेला असल्याचे सांगून सोनसाखळी खरेदी करायची असल्याचे दुकानदाराला सांगितले. यावेळी दुकानदार सोनसाखळी दाखवत असताना त्याने दोन्ही सोनसाखळ्या गळ्यात घालून आरशात पाहत होता. मात्र काही समजण्या आदोगरच तो दुकानाच्या बाहेर पडला व बाहेर लावलेल्या ज्युपीटर दुचाकीवर त्याने धूम ठोकली.