8 हजारांच्या लाचप्रकरणी महावितरणचे 'ते' दोघे अटकेत; ACB ने रंगेहात पकडलं
सोलापूर : पंतप्रधान सूर्यघर योजनेतून लोकांच्या घरांवर सौर ऊर्जा पॅनल बसवून देण्याचे काम करणाऱ्या तक्रारदाराकडून लाच मागण्यात आली. या संबंधिताकडून साहेबांसाठी 8 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या कंत्राटी कर्मचारी योगिनाथ म्हेत्रे याला लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
म्हेत्रे यांनी महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता भारत व्हनमाने व सहाय्यक अभियंता स्वाती सलगर यांच्यासाठी लाच स्वीकारल्याचे मान्य केले. त्यामुळे या तिघांविरुद्ध चावडी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सतत लाचेची मागणी होऊ लागल्याने तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठले. मंगळवारी कंत्राटी कर्मचारी योगीनाथ म्हेत्रे याने अतिरिक्त कार्यकारी अभियंता भारत व्हनमाने यांच्यासाठी 5 हजार रुपये तर सहाय्यक अभियंता स्वाती सलगर यांच्यासाठी 3 हजार रुपयांची लाच घेतली.
दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात तो कंत्राटी कर्मचारी आणि सहाय्यक अभियंता सलगर हे दोघे अडकले आहेत. परंतु, अतिरिक्त कार्यकारी अभियंता व्हनमाने रजेवर असल्याने त्यांना अटक झालेली नाही. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश पिंगूवाले यांच्या नेतृत्वातील पथकाने केली आहे.ॉ
इचलकरंजीतही कारवाई
दुसरीकडे एका घटनेत, अपार्टमेंटमध्ये वीज जोडणी देण्यासाठी 90 हजार रुपयांची मागणी करुन 30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता प्रशांत ताराचंदजी राठी (वय 49, रा. उपकार रेसिडेन्सी सांगली रोड) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहात पकडले. स्टेशन रोडवरील महावितरणच्या कार्यालयातच ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, या विभागातील भ्रष्ट कारभाराने त्रस्त काही मंडळींनी कारवाई झाल्याचे समजल्यानंतर चक्क महावितरणच्या प्रवेशद्वारातच फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद व्यक्त केला. तर कारवाईमुळे अस्वस्थ झालेल्या राठी यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.