बीड: बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा २३ सप्टेंबर २०२४ रोजी पोलिसांनी एन्काऊंटर केला होता. अक्षयने गोळीबार केल्यानंतर स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी गोळ्या झाडल्या, असा दावा पोलिसांकडून करण्यात आला. मात्र, न्यायालयीन चौकशी अहवालानुसार, अक्षयच्या हाताचे ठसे पोलिसांनी जप्त केलेल्या बंदुकीवर आढळले नाहीत, ज्यामुळे एन्काऊंटरच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. हे प्रकरण ताजे असतानाच दुसरीकडे बीड जिल्ह्यात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने एकच खळबळ उडाली. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोप वाल्मिक कराडसह त्याच्या सहकाऱ्यांनाही अटक कऱण्यात आली होती.
याशिवाय याप्रकरणात बीडमधील सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपअधिक्षक रणजित कासले यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली. आता या प्रकरणात रणजित कासले यांनी धक्कादायक गौप्यस्फोट करत थेट राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच गंभीर आरोप केले आहेत. “मला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर होती. पण मी ती नाकारली, म्हणून माझे निलंबन कऱण्यात आले, असा दावा रणजित कासले यांनी केला आहे. एका व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी यावर भाष्य केलं आहे. तसचं बोगस एन्काऊंटर कसा केला जातो. त्यात कोण कोण सामील असते, यावरही भाष्य केलं आहे.
Walmik Karad News: मला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर …; निलंबित पोलिस अधिकारी रणजीत कासलेंचा दावा
मला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर होती. ती ऑफर कशी दिली जाते ते आधी सांगतो. एक लमसम अमाऊंटची ऑफर दिली जाते. 10-20 करोडची ऑफर दिली जाते. तुम्ही बोलाल तेवढी ऑफर असते. मी सायबर गुन्हे शाखेत होतो. माझा आणि या प्रकरणाचा काही संबंधही नव्हता. पण तरीही माझ्यात गट्स आहेत हे पाहून मला ऑफर दिली गेली. पण मी एन्काऊंटर करण्यास नकार दिला. बोगस एन्काऊंटर साठी सर्वात आधी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहसचिव तीन-चारजणाची गुप्त बैठक होते. त्यानंतर आणखी ६-७ विश्वासू लोकांची टीम निवडली जाते. मग मुंबईतील अक्षय शिंदे प्रकरणात जसा त्याचा एन्काऊंटर झाला तसा ते तीन-चार अधिकारी संबंधित ठिकाणी जातात. एक अधिकारी, एक अंमलदार एक हवालदार अशी टीम तयार केलीजाते. त्यांना लमसम अमाऊंटही दिली जाते. त्यानंतरही जर काही झालचं तर , आमचंच सरकार आहे, असं सागून तुम्हाला खात्यात घेण्याची, नोकरी अबाधित ठेवण्याची शाश्वती दिली जाते. चौकशीतून मुक्त कऱण्याचे आश्वासन दिले जाते.
अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाला, पण अशा आरोपींच्या हातात बेड्या असतात, दोरखंडांने आरोपींचे हात घट्ट बांधलेले असतात, मग तो पोलिसांना मारण्याचा, त्याची पिस्तुल ओढून घेण्याचा कसा प्रयत्न करेल, हे तु्म्हीच सांगा, किती बोगस एन्काऊंटर होता, तुम्हीच सांगा.
यात जर चौकशी करायचीच असेल तर केंद्राची एसआयटी बनवा, सरकार तर नपुंसक आहेच पण विरोधी पक्षनेतेही नपुंसक आहेत. माझा आवाज उठवा तुम्ही.यात जर आरोपी करायचेच असेल तर, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना आरोपी करा. मी बीडचा आहे. पण खर सांगतो देवेंद्र फडणवीस बीडलाच घाबरतात, ते असतील गृहमंत्री पण ते बीडला घाबरतात. पंकजा मुंडे, नरेंद्र मोदींची सभा झाली. पण फडणवीस बीडला आले नाहीत. पोलीस अधिकारी असूनही मला फडणवीसांची लाज वाटते, १०-१५ वर्षात फडणवीसांनी काय केले. काहीच केलं नाही. आमच्या कल्याणाचं काम केलं नाही. त्यांचं आणि त्यांच्या मिसेसच एकच काम चालू आहे. एक्सिस बॅंकेतून ३०० रुपये घ्यायचे, आणि आपला खर्च भागवायचा. मी आवाज उठवतोय. आता तुम्हीही आवाज उठवा.