वसई/ रविंद्र माने : दिवसेंदिवस वसई विरार शहरात गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिक भयभीत होऊन जीव मुठीत घेत जगत आहेत. शहरातील गुन्हेगारांना ना कायद्याचा धाक राहिला ना पोलीसांचा. अशातच आता अंगावर काटा आणणारी धक्कादायक घटना विरार शहरात घडली आहे.
झोपेत असलेल्या गोवारी कुटुंबावर अज्ञात व्यक्तीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी पहाटे अर्नाळा गावात घडली असून,या घटनेमुळे संपूर्ण गाव हादरले आहे.अर्नाळा गावातील बंदरपाडा येथे राहणारी नेत्रा गोवारी ही तरुणी तिचे वृध्द वडील जगन्नाथ आणि आई लीला हे तिघे गाढ निद्रेत असताना,सोमवारी पहाटे 3च्या सुमारास घरात शिरुन एका अज्ञाताने,त्यांच्यावर चाॅपरने हल्ला केला. सर्वप्रथम त्याने नेत्रावर हल्ला केला,त्यावेळी तिच्या बचावासाठी वडील पुढे सरसावले असता,त्यांच्यावर आणि त्यांच्या पत्नीवरही चाॅपरने सपासप वार करण्यात आले.
आई लीला या रक्तबंबाळ अवस्थेत ओरडत घराबाहेर पडल्यावर हा हल्ला उघड झाला.त्यांचा ओरडा ऐकून जमलेल्या ग्रामस्थांनी तिघांना जवळच्या सहयोग हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले.त्यानंतर अर्नाळा सागरी पोलीस आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अथर्व क्लासेसचे प्राध्यापक सचिन गोवारी हे पत्नी,मुले,आई-वडील आणि बहीण यांच्यासह या घरात रहायला होते.मात्र,क्लासेसमुळे ते पत्नी आणि मुलांसह आगाशी येथे रहायला गेले.त्यामुळे गावातील घरात त्यांचे वयोवृद्ध वडील जगन्नाथ,आई लीला आणि बहीण नेत्रा गोवारी हे राहतात.त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी हल्लेखोराने वरच्या बाजुने घरात प्रवेश केला.तसेच प्रतिकार होऊ नये यासाठी त्याने पहाटे तीन ही साखर झोपेची वेळ निवडली.हल्लेखोर काळी जीन्स आणि निळ्या टी-शर्ट मध्ये होता.सुरवातीला हा दरोडा असल्याचा अंदाज वर्तवला जात होता.मात्र या घटनेत कोणताही ऐवज चोरण्यात आला नसल्याने नेमके कारण आणि हल्लेखोरांचा तपास केला जात आहे.फाॅरेन्सिक एक्सपर्ट चे पथक ही घटनास्थळी पुरावे गोळा करीत आहेत.
या हल्ल्यात गोवारी कुटुंब गंभीर जखमी झाले आहेत.जगन्नाथ गोवारी यांच्या हाताची बोटे,डोके आणि अन्य ठिकाणी गंभीर जखमा झाल्या आहेत.तर लीला आणि नेत्रा ही गंभीर जखमी झाल्या आहेत.त्यांच्यावर तातडीने उपचार केले जात आहेत.या घटनेने पुन्हा एकदा अनधिकृत भाडेकरुंचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.थोड्याशा भाड्यापोटी कुठलीही कागदपत्र न घेता भाडेकरुंना आसरा देणाऱ्यांची आणि अनधिकृत भाडेकरुंची चौकशी व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.