कोलकाता : वक्फ कायद्याच्या निषेधार्थ पश्चिम बंगालमध्ये हिंसक आंदोलनाची लाट पसरली असून, मुर्शिदाबाद जिल्ह्यातील विविध भागांत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. सुती, धुलियान, शमशेरगंजसह जांगीपूर, अमटला आणि चापदानी या भागांमध्ये हिंसाचार, तोडफोड आणि रेल्वे मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.
शुक्रवारी रात्रीपासून सुरू झालेला हिंसाचार शनिवारी सकाळी पुन्हा एकदा उफाळून आला. धुलियान आणि शमशेरगंज भागात शांततेचा भंग झाला असून, गोळीबाराच्या घटनाही समोर आल्या आहेत. गेल्या दोन दिवसांत एकूण चार जणांवर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. यामध्ये गोलाम मोहिउद्दीन शेख (21) आणि हसन शेख (12) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी स्पष्टपणे सांगितले की, “राज्यात वक्फ कायदा लागू केला जाणार नाही.” त्यांनी सर्व नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करताना सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्याची विनंती केली आहे.
Big Breaking: सुरक्षा दलांनी जंगलाला वेढा घातला अन्…; छत्तीसगडमध्ये २ नक्षलवाद्यांना ठोकण्यात यश
मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर लिहिताना काही राजकीय पक्षांवर टीका केली. “काही पक्ष धर्माचा वापर करून राजकीय फायदा मिळवू पाहत आहेत. त्यांच्याकडून दिशाभूल होऊ देऊ नका,” असे त्या म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या की, “प्रत्येक मानवी जीवन मौल्यवान आहे. कोणत्याही प्रकारचा धार्मिक तेढ किंवा हिंसाचार समाजासाठी घातक आहे.”वक्फ कायद्याबाबत भूमिका स्पष्ट करत ममता बॅनर्जी म्हणाल्या, “हा कायदा केंद्र सरकारचा आहे, बंगाल सरकारचा नाही. त्यामुळे त्याबाबत केंद्रानेच उत्तर द्यावे.”
राज्यातील वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर, पोलिस महासंचालक राजीव कुमार यांनीही कडक इशारा दिला आहे. “पोलिस यंत्रणा परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. कोणीही कायदा हातात घेतल्यास कठोर कारवाई केली जाईल. अफवांपासून सावध रहा आणि शांतता राखा.” असे आवाहन राजीव कुमार यांनी केलं आहे.
दरम्यान, ११ एप्रिल रोजी पश्चिम बंगालमध्ये वक्फ कायद्याविरोधात झालेल्या हिंसक निदर्शनांमध्ये मुर्शिदाबादसह चार जिल्ह्यांतील परिस्थिती बिकट बनली होती. पोलिसांनी आतापर्यंत १२० पेक्षा अधिक जणांना अटक केली असून, यामध्ये सुती येथून ७० आणि शमशेरगंज येथून ४१ जणांचा समावेश आहे.
त्या मुलाचा मृत्यू उष्माघातामुळे नव्हे तर…; वैद्यकीय अहवाल आला समोर
शुक्रवारी मुर्शिदाबाद, उत्तर २४ परगणा आणि मालदा या जिल्ह्यांमध्ये निदर्शनांचा जोर वाढला होता. राष्ट्रीय महामार्ग-१२ वर आंदोलकांनी सरकारी बसेस आणि खासगी वाहनांना आग लावली. तसेच, सुती पोलिस स्टेशन हद्दीतील साजूर क्रॉसिंगवर पोलिसांवर दगडफेक आणि कच्च्या बॉम्बने हल्ला करण्यात आला.
पोलिसांनी आंदोलकांना पळवून लावण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर केला. या हिंसाचारात १० पोलिस जखमी झाले. निदर्शनादरम्यान ३ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे, मात्र अधिकृतरीत्या याची पुष्टी झालेली नाही. परिस्थिती हाताळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे वाहतूक काही काळ बंद करण्यात आली होती. तसेच, दंगलग्रस्त भागांमध्ये इंटरनेट सेवाही तात्पुरती बंद ठेवण्यात आली.