शेतीच्या वादातून महिलेवर कोयत्याने वार; लाथाबुक्क्यांसह डोळ्यात मिरचीपूडही भिरकावली
यवतमाळ : मक्त्याने दिलेल्या शेतीच्या वादातून झालेल्या भांडणात एका महिलेच्या डोळ्यात मिरचीपूड भिरकावून तब्बल सात जणांनी तिला लाथाबुक्क्या व काठीने बेदम मारहाण केली. तसेच तिच्यावर लोखंडी सळाख आणि कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात संबंधित महिला गंभीर जखमी झाली. ही घटना पुसद तालुक्यातील राहूर शिवारात घडली होती. मात्र, याप्रकरणी बुधवारी (दि. 30) पोलिसात तक्रार देण्यात आली.
मालती संजय मिश्रा (वय 35, रा. नाईक चौक पुसद) असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. तिने राहूर शिवारातील स्वतःचे शेत मक्त्याने दिले होते. त्यानंतर कालावधी पूर्ण होताच नांगरणी करण्यासाठी ती 5 एप्रिलला दुपारी शेतात गेली. यावेळी तिच्याशी सात जणांनी वाद घातला. त्यांनी तिच्या डोळ्यात मिरचीपुड भिरकावली. तसेच लाथाबुक्यांनी व काठीने बेदम मारहाण करत लोखंडी सळाखीसह कोयत्याने हल्ला केला. ही बाब शेजारी शेतकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तिला हल्लेखोराच्या तावडीतून सोडवले.
हेदेखील वाचा : १७ व्या मजल्यावरून उडी मारून ३५ वर्षीय महिलेची आत्महत्या; घटना सीसीटीव्हीत कैद
तसेच उपचारासाठी रुग्णालयात नेले. उपचार झाल्यानंतर 30 एप्रिलला रात्री मालतीने बिटरगाव पोलिस ठाणे गाठून याप्रकरणी तक्रार दिली. त्यावरून आरोपी रमेश भोकरे, दत्ता भोकरे, अमोल भोकरे, आकाश जयस्वाल, बाळू कुंदर, प्रवीण देशमुख, बंडू कंठाळे (सर्व रा. पुसद) यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
मालेगावातही झाली होती महिलेला मारहाण
दुसऱ्या एका घटनेत, काही दिवसांपूर्वीच मालेगाव तालुक्यातील चिवरा शेतशिवारात शेतीच्या वादातून महिलेला मारहाण करण्यात आली. यामध्ये चंद्रप्रभा मुरलीधर लोखंडे (रा. वसमत, जि. हिंगोली) यांना त्यांच्या आईच्या शेतात गेल्यामुळे वाशिम येथील सात ते आठ जणांनी लोखंडी विळा व पाईपने मारून गंभीर जखमी केले. ही घटना दुपारच्या सुमारास घडली होती. आता यवतमाळमध्येही असाच प्रकार समोर आला आहे.