धक्कादायक ! महिलेने पोटच्या दोन नवजात बाळांची केली हत्या; जोडीदार हाडं घेऊन पोहोचला पोलिस ठाण्यात अन्...
त्रिशूर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणांवरून खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण यांसारख्या घटना घडत आहेत. त्यातच केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या एका महिलेने तिच्या दोन नवजात बाळांची हत्या केली.
पुडुक्कड परिसरात ही खळबळजनक घटना घडली आहे. आरोपी महिला ही एका पुरुषासोबत ‘लिव्ह-इन’मध्ये राहत होती. बाविन नावाच्या तरुणासोबत ही महिला होती. रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास दारूच्या नशेत पुडुक्कड पोलीस ठाण्यात एका बॅगेसह पोहोचला. त्यावेळी त्याने बॅगेत माझ्या आणि माझी 23 वर्षीय जोडीदार अनिशा यांच्यातील दोन नवजात बाळांची हाडं आहेत, असे सांगितले. जेव्हा पोलिसांनी ही बॅग स्वत: तपासली असता त्यांना धक्काच बसला.
दरम्यान, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत हाडांची फॉरेन्सिक तपासणी केली. तेव्हा ती हाडं नवजात बालकांची असल्याचं स्पष्ट झालं आहे. यानंतर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन सखोल चौकशी सुरू केली.
असा सुरु होता प्रकार…
अनिशानं सुरुवातीला नोव्हेंबर 2021 मध्ये झालेल्या पहिल्या मुलाचा मृत्यू नैसर्गिक असल्याचा दावा केला होता. नाभीसंबंधी नाडी गळ्यात अडकल्याने बाळ दगावले. मात्र, नंतर तिने बाळ जिवंत जन्मले होते आणि त्याचा गुदमरून खून करण्यात आला. मृतदेह घराजवळच पुरण्यात आला आणि आठ महिन्यांनंतर मी बाळाची हाडं खोदून बाविनला दिली.
हाडं साठवून ठेवण्याचं कारण समोर…
दोन्ही बाळांच्या आत्म्यांना मुक्त करण्यासाठी विधी करण्याचा हेतू होता, म्हणून हाडं त्यानं साठवून ठेवली होती. सध्या पोलिस अनिशाच्या कुटुंबीयांना गर्भधारणेबाबत काही माहिती होती का? याचाही तपास करत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी खून आणि पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा दाखल केला असून, हाडांची डीएनए चाचणीही सुरू आहे.
पुण्यात अल्पवयीन मुलाची हत्या
दुसऱ्या एका घटनेत, प्रेमाच्या त्रिकोणातून एका अल्पवयीन मुलाची हत्या झाल्याची घटना समोर येत आहे. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. हत्या झालेल्या मुलाचा चुलत भाऊ देखील या घटनेमध्ये गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हत्या झालेल्या तरुणाचे नाव दिलीप मौर्या (वय 16, रा. थॉमस कॉलनी, देहूरोड) असे आहे. तर सनी सिंग (वय- 19, रा. गंभीरपूर, जि. गोपालगंज, बिहार) असे आरोपीचे नाव आहे.