माता न तू वैरिणी ! ट्रॅव्हल्समधून महिलेने अर्भकाला फेकले रस्त्यावर; वाटेत प्रसूती होताच केलं कृत्य
परभणी : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यातच काही विचित्र प्रकारही समोर येत आहेत. असे असताना परभणीच्या पाथरी येथील देवनांद्रा परिसरात धक्कादायक घटना घडली. एका निर्दयी मातेचा क्रूर चेहरा समोर आला आहे. या महिलेने चक्क ट्रॅव्हल्समधून अर्भकाला रस्त्यावर फेकल्याची घटना घडली. पहाटेच्या सुमारास हे संतापजनक कृत्य केलं आहे.
ऋतिका ढेरे असे या महिलेचे नाव असून, तिचा साथीदार अल्ताफ शेख अशी दोन्ही आरोपींची नावं आहेत. पाथरी तालुक्यातील सेलू रोडवरील देवनांद्रा परिसरात ही घटना घडली. प्रवासी ट्रॅव्हल्समधून नवजात अर्भक रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. ही घटना मंगळवारी (दि.१५) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. डायल ११२ वर प्राप्त झालेल्या माहितीनंतर, पोलीस अंमलदारांनी तात्काळ सेलू रोडवरील देवनांद्रा परिसरात धाव घेतली. घटनास्थळी काळसर-निळसर रंगाच्या कपड्यात गुंडाळलेले नवजात अर्भक रस्त्याच्या कडेला आढळले.
दरम्यान, या ठिकाणी हजर असलेल्या नागरिकांनी अर्भक एका पांढऱ्या रंगाच्या ट्रॅव्हल्समधून फेकण्यात आले असून, गाडीवर संत प्रयाग ट्रॅव्हल्स असे नाव होते. ट्रॅव्हल्सची माहिती घेतली असता, संबंधित गाडी पुणे-परभणी व्हाया सेलू अशी सेवा करणारी असल्याचे निष्पन्न झाले.
ट्रॅव्हल्समध्येच प्रसूती
तपासात, प्रवासादरम्यान एका महिलेला प्रसूती वेदना झाल्या व ट्रॅव्हल्समध्येच प्रसूती झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर नवजात अर्भक नको असल्याने गाडीतून रस्त्यावर फेकल्याची कबुली संबंधित दोघांनी दिली. या प्रकारामुळे नवजात अर्भकाच्या जीविताला धोका निर्माण झाला असून, संबंधित दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
ऋतिका-अल्ताफ पुण्यात राहायचे एकत्र
ऋतिका आणि तिचा साथीदार अल्ताफ मेहनुद्दीन शेख हे दोघं मागील काही महिन्यांपासून पुण्यात एकत्र राहत होते. त्यांनी लग्न केल्याचं पोलिसांना सांगितलं आहे. मंगळवारी पहाटे संत प्रयाग ट्रॅव्हल्सने हे दोघं पुण्याहून परभणीकडे निघाले होते. पाथरी तालुक्यातील देवनांद्रा शिवाराजवळ गाडी आली असता ऋतिकाची अचानक प्रसूती झाली. प्रसूतीनंतर त्या तरुणीनं नवजात अर्भकाला काळसर आणि निळसर कपड्यांमध्ये गुंडाळून, थेट चालत्या गाडीमधून रस्त्यावर फेकून दिलं.