पुणे-नाशिक महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा; चोरट्यांनी हवेत गोळीबार केला अन्...
मंचर : पुणे-नाशिक महामार्गावरील तांबडेमळा (ता. आंबेगाव) येथे ऋषी पेट्रोल पंपावर शुक्रवार दिनांक ३ ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास दरोड्याची घटना घडली आहे. चार चोरट्यांनी पिस्तूलचा धाक दाखवून पंपातील कर्मचाऱ्यांकडून १ लाख ९० हजार ३७० रुपयांची रोकड लुटली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले, तर संपूर्ण दरोड्याची घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली आहे.
मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरटे एका मोटारसायकलवर आले होते. त्यापैकी दोन चोरटे पंपाच्या ऑफिसमध्ये घुसले, तर उर्वरित दोन बाहेर लक्ष ठेवत उभे राहिले. आत प्रवेश केल्यावर त्यांनी कर्मचाऱ्यांकडे पिस्तूल दाखवत पैसे मागितले. घाबरलेले कर्मचारी हात वर करून शांत राहिले, तर चोरट्यांनी ड्रॉवरमधील रोकड उचलून घेतली. त्यांनी “पैसे नाही दिले, तर जीवे मारू” अशी धमकी दिली.
शिक्रापूर पोलिसांत गुन्हा दाखल
पैसे घेतल्यानंतर चौघे चोरटे एका मोटरसायकलवरून पळून गेले. पंपापासून सुमारे १५० मीटर अंतरावर कर्मचाऱ्यांनी त्यांचा पाठलाग सुरु केला. पाठलाग करणाऱ्यांना घाबरवण्यासाठी एका चोरट्याने हवेत गोळीबार केला, ज्यामुळे कर्मचारी भयभीत झाले आणि चोरटे नारायणगावच्या दिशेने फरार झाले. घटनेची माहिती मिळताच मंचर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पेट्रोलपंपाचे कर्मचारी आकाश मच्छिंद्र डोके (रा. महाळूगे पडवळ) यांनी शिर्कापूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली.
हे सुद्धा वाचा : घर फोडण्याचा डाव फसला, पण चोरट्यांनी परत जाताना…; कोथरुडमध्ये नेमकं काय घडलं?
शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात
आकाश डोके यांनी सांगितले, रात्री अचानक दोन जण पिस्तूल घेऊन पंपाच्या कार्यालयात घुसले. आम्ही जीव वाचवण्यासाठी शांत उभे राहिलो. त्यांनी पैसे घेतले आणि जाताना गोळीबार केला. त्या क्षणी जीव दचकलाच होता.
मंचर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी सांगितले की, पोलिसांनी पंचनामा करून सीसीटीव्ही फुटेज तपासणे सुरु केले आहे. संशयितांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात केली आहेत, तसेच या घटनेतील सर्व पैलूंचा सखोल तपास सुरू आहे. या प्रकारामुळे महामार्गावरील व्यापारी व नागरिकांमध्ये सुरक्षाविषयी चिंता वाढली आहे. पोलीस प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.