मैत्रिणींसाठी बनला चोर
नागपूर : बी.एस्सी.च्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याने मित्र-मैत्रिणींना प्रभावित करण्यासाठी चोरीचा मार्ग पत्करला. चोरीचा माल विकून मिळालेले पैसे मित्र, मैत्रिणींवर उधळायचा. गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून 17 तोळे दागिन्यांसह 20 लाख 13 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशीत त्याच्याकडून 5 ठाण्यांच्या हद्दीतील घरफोडींचे 9 गुन्हे उघडकीस आले.
नमन पेठे (वय १९, रा. शारदानगर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. नमन एका नामांकित महाविद्यालयाचा बी.एस्सी. प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे. त्याने बेलतरोडी, अजनी, हुडकेश्वर, सक्करदरा, प्रतापनगर ठाण्यांच्या हद्दीत लागोपाठ घरफोड्या केल्या. या ठिकाणांहून त्याने तब्बल १८.५० तोळे दागिने आणि ७८ हजार रोख चोरली. दागिने वितळवून कवडीमोल भावात सोनाराला विकले. आरोपी नमन विरोधात पाचही पोलिस ठाण्यांत चोरीचे गुन्हे दाखल आहेत. या तक्रारीरून गुन्हे शाखा युनिट ४ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कमलाकर गड्डीमे आणि त्यांचे पथक या गुन्ह्यांचा समांतर तपास करीत होते.
या दरम्यान गस्तीवर असताना नमन विनाक्रमांकाच्या दुचाकीने फिरताना दिसला. संशयाच्या आधारावर ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीला बेलतरोडी ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक कमलाकर गड्डीमे यांच्या पथकाने केली.
बीएससीच्या विद्यार्थ्याच्या कृत्याने सर्वांना धक्का
बीएससीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने अशाप्रकारचे कृत्य केल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. पोलिसांकडून याप्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे. चौकशीनंतर आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
कोल्हापुरातही चोरीची घटना
कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील पुष्पनगर येथील सराफी दुकानात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री चोरी केली. सोने-चांदीचे दागिने व रोख असा एकूण ८७ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना पहाटे उघडकीस आली. याबाबतची फिर्याद आशिष अरविंद होगाडे (वय ३४, रा. पुष्पनगर) यांनी भुदरगड पोलिसांत दिली आहे. त्यानुसार, आता पोलिसांकडून तपास केला जात आहे.