Crime
दर्यापूर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यातच दर्यापूर शहरातील मोमीनपुरा येथे 3 सप्टेबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास एका तरुणावर काही कारण नसताना चाकूने वार केल्याची घटना घडली होती. या हल्ल्यात जखमी झालेल्या त्या तरुणाचा नागपूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
हेदेखील वाचा : सुप्रीम कोर्टाने दिलेला अल्टिमेटम संपला, तरीही आरजी कार हॉस्पिटलचे डॉक्टर संपावर ठाम, आता पुढे काय?
इमरान खान वल्द हुसेन खान (34, रा. मोमीनपुरा) असे मृताचे नाव आहे. पोलिस सुत्रानुसार, इमरान खान वल्द हुसेन खान हा त्यांच्या घरासमोर उभा असताना आरोपी शेख नईम वल्द शेख कय्युम व त्याचा भाऊ शेख नाजीम यांचे वाद सुरू होते. दरम्यान, इमरान हा तेथे गेला असता, आरोपींनी काहीही कारण नसताना इमरान खानवर चाकूने हल्ला केला. त्यामुळे त्याच्या मानेवर, पाठीवर, डाव्या बाजूला व डाव्या बर्गळीवर गंभीर जखमा झाल्या.
या घटनेनंतर जखमी इमरानला रिजवान खान वल्द हुसेन खान, जावेद खान हसन खान यांनी प्रथम दर्यापूर उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी नेले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले होते. परंतु, त्याची प्रकृती पाहून तेथूनही त्याला नागपूर येथील रुग्णालयात नेण्यात आले होते. परंतु, सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास इमरान खान याचा मृत्यू झाला. मृत हा अपंग असल्याची माहिती समोर येत आहे.
…अन्यथा मृतदेह पोलिस ठाण्यात आणू
इमरानच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. नातेवाईकांनी माहिती देत म्हटले की, सदर भांडणांमध्ये 3 आरोपी असताना पोलिसांनी एकाच आरोपीला का अटक केली? जर इतर आरोपींना अटक केले नाही, तर आम्ही मृतदेह ठाण्यात आणून ठेवणार आहे. आरोपींना अटक होईपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा इमरान खान यांच्या नातेवाईकांनी घेतला होता.
हेदेखील वाचा : पत्नीनेच केला पतीचा चाकूने भोसकून खून; कारण वाचून बसेल धक्का