सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : सिंहगड रस्त्यावरील नर्हे परिसरात मद्यपी पतीच्या त्रासातून पत्नीने त्याचा स्वंयपाकातील चाकू भोसकून खून करण्यात केल्याची घटना घडली. रविवारी रात्री हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पत्नीला अटक केली आहे. किरपा बिप्त (वय ४२, मूळ रा. नेपाळ) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पत्नी हिरा बिप्त (वय ४६) हिला सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, बिप्त मूळचे नेपाळमधील आहे. नऱ्हे भागातील मानाजीनगर परिसरात असलेल्या स्वप्नपूर्ती रेसीडन्सी सोसायटीत ते रखवालदार म्हणून काम करायचे. किरपाला दारू पिण्याचे व्यसन होते. तो दारु पिऊन पत्नी हिराला त्रास द्यायचा. या कारणावरुन त्यांच्यात नेहमी वाद व्हायचे. रविवारी सायंकाळी त्यांच्यात वाद झाले होते. हिराने चाकूने पती किरपावर वार केले. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राघवेंद्र क्षीरसागर यांनी घटनास्थळी भेट दिली. किरपाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस करत आहेत.
पुण्यात खूनाची घटना वाढल्या
टोळी युद्धातून माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खूनाची घटना घडल्यापासून पुणे शहरातील खूनाचे सुरूच राहिले आहे. हडपसरमधील खूनानंतर स्वारगेटमधील डायसप्लॉट परिसरात मोक्कातील गुन्हेगाराने जामीनावर बाहेर आल्यानंतर एका तरुणाचा जुन्या वादातून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याच्यावर चाकूने वार करून निर्घुन खून केला असून, या खुनाने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. सुनील सरोदे (वय २०, रा. डायस प्लॉट, गुलटेकडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. सरोदेच्या मानेवर चाकूने वार करण्यात आला. मानेची नस तुटल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊन त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी रोहन कांबळे, साहिल कांबळे, शिवशरण धेंडे यांच्यासह पाच जणांना अटक केली आहे. याप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद केला आहे. पुण्यातील वेगवेळ्या भागातील खूनाच्या अनेक घडना उघडकीस येत आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली आहे.