राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घातला आव्हाडांशी वाद; प्रचार पत्रकावर फोटो न छापल्याने नाराजी
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील दोन मोठे नेते आपसात भिडले असून, या वादाचा परिणाम निवडणुकीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या प्रचार पत्रकावर फोटो न छापल्यामुळे नाराज झालेल्या अल्पसंख्यांक विभागाचे नेते युनूस शेख यांनी आव्हाडांसमोर नाराजी व्यक्त केली.
हेदेखील वाचा : BJP Candidate List: भाजपची चौथी यादी जाहीर, मीरा भाईंदरमधून नरेंद्र मेहता यांना तिकीट, उमरेडमधून कोण?
जितेंद्र आव्हाड आणि युनूस शेख यांच्यात वाद झाल्याचे समोर आले आहे. प्रचार पत्रकावर फोटो न छापल्याने हा प्रकार घडला. यावेळी दोघांमध्ये बाचाबाची देखील झाली. या दोघांमध्ये भरचौकात बाचाबाची झाली असून, दोघांमधील वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना 27 ऑक्टोबर रोजी मुंब्रा विधानसभा मतदारसंघात सायंकाळी घडली. आव्हाड त्यांचा प्रचार करत असताना त्यांच्या पक्षाच्या राज्य अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष युनूस शेख यांच्याबरोबर बाचाबाची झाली.
दोघांमध्ये नेमका कशावरून वाद झाला हे स्पष्ट नसले तरी व्हिडीओत दिसते आहे की दोघेही हाणामारी करेपर्यंत एकमेकांशी वाद घालत होते. इतर कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर दोघांमधील वाद निवळला. इतर कार्यकर्त्यांनी त्यांना कॅमेऱ्यांपासून दूर नेले.
जितेंद्र आव्हाड यांनी केला स्वत:चा जाहीरनामा प्रसिद्ध
जितेंद्र आव्हाड यांनी निवडणुकीच्या प्रचारासाठी स्वतःचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्याचे प्रचार पत्रके मतदारसंघात वाटले जात आहेत. या जाहीरनाम्यावरूनच आव्हाड व युनूस शेख यांच्यात वाद झाल्याचे सांगितले जात आहे. या दोघांमध्ये या आधीपासूनच संघर्ष चालू होता जो या निवडणूक काळात चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले.
हेदेखील वाचा : Maharashtra Election 2024: एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस; महायुतीचा सर्वात पॉवरफूल नेता कोण?