
NCP Jayprakash Dandegaonkar son Atish Dandegaonkar joins BJP Hingoli News
मकरंद बांगर : हिंगोली : वसमतच्या राजकीय पटावर मागील तीन दशकांहून अधिक काळ ‘जयप्रकाश’ हेच सत्तेचे केंद्रबिंदू राहिले. कधी जयप्रकाश मुंदडा, तर कधी जयप्रकाश दांडेगावकर या दोन नावांभोवतीच वसमत विधानसभा मतदारसंघाचे (Hingoli News) राजकारण फिरताना दिसले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे जिल्ह्यातील आधारवड म्हणून ओळख निर्माण केलेले माजी सहकार राज्यमंत्री तथा राज्य साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी सहकार, शिक्षण आणि विकासाच्या माध्यमातून ठसा उमटवला. (Political News)
२०१९ नंतरच्या बदलत्या राजकीय समीकरणात त्यांचे शिष्य राजू नवघरे आमदार झाले आणि पुन्हा निवडूनही आले. मात्र, मागील निवडणुकीत दांडेगावकर स्वतः शिष्याविरुद्ध मैदानात उतरले. या थेट लढतीत त्यांना पराभव पत्करावा लागला. यानंतर वसमतच्या राजकारणात शांत पडलेली खळबळ आता पुन्हा उसळली आहे. या पार्श्वभूमीवर दांडेगावकरांनी नवा राजकीय प्रयोग हाती घेत चिरंजीव आतिश दांडेगावकर यांना भारतीय जनता पक्षात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. वडिलांचा अनुभव आणि संघटन कौशल्य यांची जोड घेत आतिश नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणार, अशी चर्चा रंगली आहे.यावेळी
हे देखील वाचा : 12 वीच्या विद्यार्थ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांची करडी नजर; परीक्षा केंद्रावर कर्डिले ठाण मांडून
५०० चारचाकी वाहने
प्रवेशासाठी मुंबईकडे सुमारे ५०० चारचाकी वाहनांचा ताफा घेऊन शक्तीप्रदर्शन करत रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या शक्तीप्रदर्शनातून भाजपात प्रवेश हा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ताकद दाखवण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. वसमत विधानसभा मतदारसंघात गेल्या चार दशकांत मंत्रिपदाची संधी प्रामुख्याने याच मतदारसंघाला लाभली, ही बाब विशेष ठरली. सहकार क्षेत्रातील बळकटी, विकासकामांची मालिका आणि संघटनात्मक पकड यामुळे दांडेगावकरांचे वर्चस्व टिकून राहिले. नवी समीकरणे जुळवली जात आहेत.
हे देखील वाचा : पुण्यतिथीदिनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या; विधीमंडळामध्ये पहिल्यांदाच मागणी
भाजपाला अच्छे दिन ?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या असल्या तरी आगामी काळात मिनीमंत्रालयापासून पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. या पार्श्वभूमीवर आतिश यांच्या भाजपप्रवेशामुळे वसमतमध्ये भाजपाला ‘अच्छे दिन’ येतील का, याची चर्चा सुरू झाली आहे. दांडेगावकरांचे शिलेदार आणि दुसरी फळीही भाजपाच्या दिशेने सक्रिय होत असल्याचे संकेत मिळत आहेत. तथापि, राष्ट्रवादी (शरद पवार गट) ची धुरा सांभाळणारे दांडेगावकर एकीकडे पक्षनिष्ठा टिकवून ठेवत असताना दुसरीकडे भाजपाला बळ कसे देतील, हा पुढील काळातील कळीचा प्रश्न ठरणार आहे. ‘दोन जयप्रकाश’ युगानंतर वसमतच्या राजकारणात आता ‘नवा अध्याय’ सुरू झाला असून, या प्रयोगाचे परिणाम काय होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.