Ajit Pawar's reaction to Sharad Pawar's imitation of Ajit Pawar
पुणे : विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यामध्ये राजकारण रंगले आहे. महायुतीसह महाविकास आघाडीने उमेदवारी जाहीर केले असून उमेदवारांनी अर्ज देखील दाखल केले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली आहे. . 288 जागांसाठी 7,995 उमेदवारांनी 10,905 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आता प्रचाराचा धुराळा उडाला असून सभा आणि रॅली वाढणार आहे. शरद पवार व अजित पवार यांच्यामध्ये वाद विवाद देखील सुरु झाले आहेत.
बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होणार आहे. अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार यांच्याकडून युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघ सर्वत्र चर्चेत आला आहे. कण्हेरी गावामध्ये युगेंद्र पवार यांच्या प्रचाराचा नारळ फुटला. तर तासगावमधून अजित पवार यांनी प्रचाराला सुरुवात केली. संजय काका पाटील यांच्या प्रचाराच्या पहिल्याच सभेवेळी अजित पवार हे भावनिक झालेले दिसून आले. अजित पवारांनी भर सभेमध्ये डोळ्याला रुमाल लावून अश्रू टिपले. त्यांच्या या कृतीची नक्कल जेष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे. शरद पवार यांनी भर सभेमध्ये अजित पवारांप्रमाणे रुमाल लावून नक्कल केली. यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. आता अजित पवार यांना शरद पवारांची नक्कलेवर प्रत्युत्तर दिले आहे.
एका मराठी वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमामध्ये अजित पवार यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केले. यावेळी अजित पवार यांनी शरद पवारांच्या नकलेवर प्रतिक्रिया दिली. अजित पवार म्हणाले की, “शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहे. प्रगल्भ नेते आहेत. त्यामुळे प्रगल्भ नेत्याने माझ्यासारख्या मुलाप्रमाणे असलेल्या माझी नक्कल करणे, साहेबांनी नक्कल करणे अनेकांना आवडलं नाही. युगेंद्र पवारांनी किंवा इतरांनी केलं असतं तर ठीक होतं. इतके दिवस वाटत होतं राज ठाकरेच नक्कल करतात, पण काल साहेब ही दिसले. मी शरद पवार साहेबांना देव मानलं. त्यांनी माझी नक्कल केली. मी घरचा मुलगा होतो. माझी नक्कल त्यांनी करणे योग्य नव्हतं,” असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.
हे देखील वाचा : मी पक्षासाठी गुवाहाटीपर्यंत गेले पण तरी…; नाराज महिला नेत्यानी व्यक्त केली खंत
पुढे अजित पवार म्हणाले की, “शरद पवारांना एक नेते म्हणून देश एका उंचीवर पाहतो. त्यांनी अशी नक्कल करणं अनेकांना आवडलं नाही. मी रुमाल काढला नव्हता, त्यांनी रुमाल काढला. मी आईचं नाव घेतल्यानंतर थोडं भावनिक झालो होतो. कधी-कधी असं होतं. पण माझं रडणं नैसर्गिकपद्धतीने झालं. मी साहेबांना दैवत मानलं आणि त्यांनी माझी नक्कल केली, याचं खूप वाईट वाटलं,” अशा भावना अजित पवार यांनी शरद पवारांच्या नक्कल करण्याबाबत व्यक्त केल्या आहेत.