chandraknat patil madhuri misal siddharth shirole Candidacy By bjp
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवार जाहीर करण्यामध्ये भाजपने बाजी मारली आहे. भाजपकडून पहिले 99 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये बहुतांशी आमदार हे सध्या विद्यमान असून फक्त मोजकेच नवीन चेहरे समोर आले आहेत. भाजपच्या पहिल्या यादीमध्ये पुणे शहरात एकूण 8 मतदारसंघ आहेत. त्यापैकी केवळ तीन मतदारसंघाचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यामध्ये 21 मतदारसंघ असून त्यापैकी सहा मतदारसंघामधील उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. पुणे शहरामध्ये एकूण आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी तीन विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. हे तिन्हीही उमेदवार हे भाजपचे सध्याचे विद्यमान उमेदवार आहेत. यामध्ये शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिरोळे यांचा हा पारंपरिक मतदारसंघ असून सिद्धार्थ शिरोळे यांना भाजपने पुन्हा एकदा संधी दिली आहे.
हे देखील वाचा : अशोक चव्हाणांच्या मतदारसंघाची धुरा आता मुलीकडे; श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी जाहीर
त्याचबरोबर पुण्यामधून पर्वती विधानसभा मतदरसंघाची देखील उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पर्वतीमध्ये भाजपमध्ये दोन गट पडल्याचे दिसून आले होते. मात्र त्यानंतर देखील विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांना पुन्हा एकदा भाजपकडून संधी देण्यात आली आहे. त्या पर्वती विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडून येणाऱ्या एकमेव महिला आमदार आहेत. त्याचबरोबर कोथरुड विधानसभा मतदारसंघाची देखील उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना पुन्हा एकदा कोथरुड विधानसभा मतदारसंघावर उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
नमस्कार!
कोथरूडमधील माझ्या प्रिय मतदार बंधू-भगिनींनो,
तुमच्या प्रेम आणि विश्वासाने मला पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीत तुमचा प्रतिनिधी होण्याची संधी मिळाली आहे. या संधीसाठी मी सर्व कोथरुडकरांचे मनःपूर्वक आभार मानतो.
तुमचे आशीर्वाद आणि पाठबळ हेच माझे प्रेरणास्थान आहे.… pic.twitter.com/LNiYDDKhoU— Chandrakant Patil (@ChDadaPatil) October 20, 2024
पुणे शहरातील आठ पैकी केवळ तीन विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार जाहीर झाले आहेत. मात्र शहरातील मध्यवर्ती भागातील आणि महत्त्वपूर्ण अशा कसबा विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. दिवंगत नेते गिरीश बापट यांच्या निधनानंतर पोटनिवडणुक घेण्यात आली. यामध्ये भाजपकडून हेमंत रासने यांना संधी देण्यात आली होती. मात्र पक्षश्रेष्ठींच्या अथक प्रचारानंतर देखील रासने यांचा पराभव झाला होता. रवींद्र धंगेकर यांच्या विजयाची चर्चा राज्यभर झाली होती. यानंतर आता कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे त्याचबरोबर माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक हे देखील इच्छुक आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा रासने की यावेळी विधानसभेला नवीन नेत्याला भाजप संधी देणार याची उत्सुकता लागली आहे. पण भाजपच्या पहिल्या यादीमध्ये तरी कसबा विधानसभा मतदारसंघ महायुतीच्या उमेदवाराच्या प्रतिक्षेमध्ये राहिला आहे.