Bhai Jagtap's tongue slipped while criticizing the Election Commission
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी संपली आहे. मात्र राज्याचे राजकारण रंगले आहे. निवडणुकीचा पूर्ण निकाल हा महायुतीच्या बाजूने एकतर्फी लागला आहे. बहुमतापेक्षा अधिक मताधिक्य हे महायुतीला मिळाले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. कॉंग्रेस पक्षाकडून ईव्हीएम मशीनवर आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले जात आहेत. आता कॉंग्रेस नेते व आमदार भाई जगताप यांनी जहरी टीका केली आहे. मात्र ही टीका करताना त्यांची जीभ घसरली आहे.
मतदानाच्या दिवशी सायंकाळी अचानक मतदानाचे प्रमाण वाढले. ईव्हीएममध्ये घोटाळा करुन शेवटच्या तासात ७६ लाख मतदान वाढल्यामुळे मविआचा पराभव झाला, असा आरोप नाना पटोले यांच्याकडून केला जात आहे. काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार भाई जगताप यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. भाई जगताप यांनी निवडणूक आयोगाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराबाहेर बसलेला श्वान आहे”, अशी टीका भाई जगताप यांनी केली.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
माध्यमांशी संवाद साधून भाई जगताप म्हणाले की, “मी मागील 45 वर्षांपासून राजकारणात आहे. महाराष्ट्रात विधानसभेचा निकाल लागला तो अनपेक्षित आहे. महायुती सरकारने एवढे मोठे काही काम केले नव्हते. चार महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत लोकांनी त्यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. मी आधीपासून सांगत आलो आहे की, हा सर्व ईव्हीएमचा खेळ आहे. आज नाही तर उद्या यावर चर्चा व्हायलाच हवी. म्हणूनच काँग्रेसने पुन्हा मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याचे आवाहन केले आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपल्या देशाकडे पाहिले जाते. जर या लोकशाहीवर जर संशय घेतला जात असेल तर त्याचे उत्तर निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारला द्यावेच लागेल.” असा घणाघात भाई जगताप यांनी केला.
पुढे भाई जगताप यांची टीका करताना जीभ घसरली. ते म्हणाले की, “निवडणूक आयोग हे पंतप्रधान मोदींच्या घराबाहेर बसलेले श्वान आहे. केंद्रीय यंत्रणा लोकशाहीला बळकट करण्यासाठी तयार करण्यात आल्या होत्या. मात्र दुर्दैवाने त्याचा दुरुपयोग सुरू आहे. महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशभरात कांड होत आहेत,” अशा खालच्या शब्दांमध्ये भाई जगताप यांनी टीका केली आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
त्यांच्या या वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा झाली. भाई जगताप यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर त्यांच्यावर जहरी टीका करण्यात येत आहे. मात्र भाई जगताप हे त्यांच्या वक्तव्यावर ठाम आहेत. भाई जगताप म्हणाले की, “निवडणूक आयोग आभाळातून आलेला नाही. लोकशाहीला बळकट करण्यासाठी आयोगाची स्थापना झाली असून कुणाची हुजरेगिरी करण्यासाठी आयोगाची स्थापना झालेली नाही. आयोग हुजरेगिरी करत असल्यामुळेच मी त्यांच्यावर टीका केली. मी माझ्या विधानावर ठाम आहे. टीएन शेषण यांनी ज्याप्रकारे काम केले, तसेच काम करण्याची आता गरज आहे,” असे मत भाई जगताप यांनी व्यक्त केले.