मुख्यमंत्रिपदावरून एकमत होत नसतानाच आता एकनाथ शिंदे घेणार मोठा निर्णय
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीचा निकालही जाहीर झाला आहे. यामध्ये भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीला चांगले यश मिळाले असून, बहुमताचा आकडाही पार केला आहे. या निकालाला आता आठवडा होत आहे. तरी नव्या सरकारबाबतचा मुद्दा अजूनही अडकला आहे. शुक्रवारी मुंबईत होणारी महायुतीची महत्त्वाची बैठक पुढे ढकलून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक साताऱ्यात गेले. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
हेदेखील वाचा : ७ दिवसांत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली नाही तर..; काय सांगतात नियम अन् राज्यपाल कोणता निर्णय घेऊ शकतात? वाचा सविस्तर
शिवसेनेने मुख्यमंत्रिपदावरील आपला दावा सोडला असला तरी गृह आणि अर्थ यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांवर डोळा आहे. ही खाती मिळावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यातच एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील आपल्या मूळ गावी गेले आहेत. त्यावरच शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट म्हणाले, ‘एकनाथ शिंदे यांना कोणताही मोठा निर्णय घ्यायचा असेल तेव्हा ते त्यांच्या मूळ गावी जातात. उद्या संध्याकाळपर्यंत ते मोठा निर्णय घेतील. शिंदे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारतील असे मला वाटत नाही’, असे शिरसाट यांनी यापूर्वी म्हटले होते.
त्याचवेळी महायुतीची बैठक 1 डिसेंबरला होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. त्यासाठी भाजपचे 2 निरीक्षक मुंबईत येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होऊन मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानावर शपथविधी सोहळा होऊ शकतो.
गृह आणि अर्थ मंत्रालयावर चर्चा अडकली
शिंदे सरकारमध्ये गृहखाते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तर अर्थखाते अजित पवार यांच्याकडे होते. मुख्यमंत्रिपद सोडायचे झाल्यास शिवसेनेने गृह आणि अर्थ मंत्रालयावर दावा केल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, भाजपला गृह आणि अजित पवार यांना अर्थमंत्रालय सोडायचे नाही. एकनाथ सरकारमध्ये गृहखाते उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे होते, असा शिवसेनेचा युक्तिवाद आहे. त्यानुसार शिंदे उपमुख्यमंत्री झाले तर त्यांना गृहमंत्रालय मिळावे.
बिहार पॅटर्न महाराष्ट्रात राबवावा
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला एवढा मोठा विजय मिळाला. त्यामुळे बिहारच्या धर्तीवर तेच मुख्यमंत्री व्हावेत, असे शिवसेनेच्या काही नेत्यांचे म्हणणे आहे. बिहारमध्ये जेडीयूच्या जागा कमी असूनही मुख्यमंत्री नितीशकुमार आहेत. त्याचवेळी शिंदे यांनी उपमुख्यमंत्री व्हावे, असे पक्षातील काही नेत्यांचे मत आहे.
भाजप करतंय मराठा नेत्यांचाही विचार
288 जागांच्या विधानसभेत मराठा समाजाचे आमदार मोठ्या संख्येने असल्यामुळे मुख्यमंत्री निवडण्यात जातीय अंकगणित मोठी भूमिका बजावू शकते, असे मानले जाते. देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण आहेत. अशा स्थितीत भाजप नेतृत्वही काही मराठा नेत्यांचा मुख्यमंत्रिपदासाठी विचार करेल, असे म्हटले जात आहे.
हेदेखील वाचा : सत्ताधारी पक्षाला मिळाला निवडणुका जिंकण्याचा नवा प्लॅन; लालची योजना फेका अन् विजय मिळवा