समरजितसिंह घाटगे यांच्या प्रचारार्थ गडहिंग्लज येथे रेकॉर्डब्रेक सभा
गडहिंग्लज : ईडीच्या समोर आपल्या केसेस पुन्हा ओपन होतील. याची चिंता ज्यांना आहे. तेच लोक तुम्हाला आम्हाला सोडून गेले. तिकडे गेले आणि निर्लज्जपणे सांगताहेत पवारसाहेबांना विचारून आम्ही गेलो. झक मारायची अन् दुसऱ्याचे नाव घ्यायचे ही गोष्ट आम्ही कदापिही मान्य करणार नाही. म्हणून अशा लोकांना धडा शिकवायचा. त्यांच्यापैकीच एक हसन मुश्रीफ आहेत. त्यामुळे उद्याच्या निवडणुकीत या गद्दार हसन मुश्रीफांना पाडलंच पाहिजे….पाडलंच पाहिजे…पाडलंच पाहिजे….अशा शब्दांत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या गद्दारीचा समाचार राष्ट्रवादी सर्वेसर्वा शरद पवार यांनी घेतला.
हेदेखील वाचा : ‘सरकार बदलण्याची आता वेळ आली, कर्तृत्त्ववान माणसांच्या हाती सरकार द्यायचंय’; शरद पवारांचं मतदारांना आवाहन
गडहिंग्लज येथे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार समरजितसिंह घाटगे यांच्या प्रचारार्थ आयोजित विराट परिवर्तन महासभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार छत्रपती शाहू महाराज होते. शरद पवार पुढे म्हणाले, “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेमध्ये बदल करण्यासाठी महायुतीला ४०० पार खासदार हवे होते. आम्ही लोकसभेला हा प्रयत्न हाणून पाडला. आम्ही जागे आहोत, चुकीच्या गोष्टी घडू देणार नाही. देशावर संकट येऊ देणार नाही, कारण तुम्ही सारे आमच्यासोबत आहात’.
लोकसभेत धक्का बसला म्हणून बहिणींवर प्रेम उफाळून आलं
तसेच लोकसभेत धक्का बसला म्हणून बहिणींवर प्रेम उफाळून आलं. आज राज्यातील महिलांवर अत्याचार वाढले असताना त्याकडे सरकारचे लक्ष आहे का? भगिनींची काळजी घेऊ न शकणारे हे सरकार सर्वसामान्यांचे, लाडक्या बहिणींचे राज्य आहे का? परस्त्रीला मातेसमान मानायला शिकवणाऱ्या छत्रपती शिवरायांची संस्कृती आपली संस्कृती आहे.
आमच्याही मागे ईडी लागली होती पण…
चारित्र्य स्वच्छ असेल तर पळून जावे लागत नाही. आमच्याही मागे ईडी लागली होती. मात्र आम्ही घाबरलो नाही आणि पळूनही गेलो नाही. मी ईडीकडे गेलो तर ते म्हणाले, चूक झाली, तुम्ही येऊ नका. आणि हे तुरुंगात जावे लागू नये, म्हणून पळून गेले. ईडीची फाईल फक्त कपाटात ठेवली आहे, बंद नाही झाली. जेव्हा पुन्हा उघडेल, तेव्हा तुरुंगात जावंच लागेल. आज ना उद्या हे लोक तुरुंगात जाणारच आहेत. ही मंडळी मात्र ईडीच्या कारवाईच्या भितीने पूर्णपणे घाबरलेली आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.
कोल्हापूर हा ऐतिहासिक वारसा जपणारा
मला अभिमान वाटतो, साऱ्या देशाने स्वीकारले, असे महापुरुष या भूमीत जन्माला आले. कोल्हापूर हा ऐतिहासिक वारसा जपणारा राजर्षी शाहू महाराजांचा विचार जपणारा असून देशाने त्यांचे सूत्र स्वीकारले असून जातपात, धर्मभेद हा देश पाळत नाही. तुमच्याकडे सुशिक्षित आणि चारित्र्यवान समरजितसिंह घाटगे हे उमदेवार आहे. महाराष्ट्राला योग्य दिशेने नेण्याची जबाबदारी आता आपली असून यासाठी येत्या 20 तारखेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटण दाबून समरजीतसिंह घाटगे व नंदा बाभुळकर यांना विजयी करा, असेही आवाहन केले.
हेदेखील वाचा : मतासाठी शपथ घेणाऱ्या उमेदवाराला मतदान न करण्याचा स्वाभिमानी जनतेचा निर्धार : समरजीतसिंह घाटगे