10 वर्षांत जिल्ह्याला 20 हजार कोटी : नितीन गडकरी
वर्धा : रस्ते-पुलांचे जाळे विणण्यासाठी मागील 10 वर्षांच्या काळात माझ्या खात्याने एकट्या वर्धा जिल्ह्याला 20 हजार कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. सिंदी (रेल्वे) येथे ड्रायपोर्टचे काम गतीने सुरू झाले आहे. या माध्यमातून हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध होईल. वर्धा जिल्ह्यात मोठा उद्योग उभारण्याची विनंती मी बजाज परिवाराला केली आहे. वर्धा जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
हेदेखील वाचा : बांगलादेश पुन्हा अस्थिरतेच्या दिशेने?; शेख हसीना यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आज उतरणार रस्त्यावर
आर्वी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुमित वानखेडे यांच्याकरिता कारंजा येथे देवळी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राजेश बकाने यांच्यासाठी पुलगाव येथे, हिंगणघाट येथे भाजपचे उमेदवार आमदार समीर कुणावार यांच्याकरिता समुद्रपूर, तर वर्धा येथे भाजपचे उमेदवार आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या प्रचारार्थ नितीन गडकरी यांच्या सभा झाल्या. सभांना चांगली गर्दी जमली होती.
यावेळी पुढे बोलताना गडकरी म्हणाले, काँग्रेसच्या घराणेशाहीवर आधारित 60 वर्षांच्या सत्ताकाळात जनतेच्या मुलभूत गरजांना प्राधान्य देण्यात आले नाही. पंतप्रधानांचा मुलगा पंतप्रधान, मंत्र्यांची पोरं मंत्री, खासदाराचा मुलगा खासदार, आमदाराचा मुलगा आमदार असेच आतापर्यंत चालत आले आहे. पण, भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. तो पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा नितीन गडकरींचा पक्ष नाहीच’.
भाजपमध्ये कार्यकर्त्यांनाही दिली जाते उमेदवारी
भाजप पक्षात कार्यकर्त्यांनाही उमेदवारी दिली जाते. पण, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळत नाही. काँग्रेसच्या काळात रस्ते, शाळा दुर्लक्षित राहिल्या. पण, भाजपच्या कार्यकाळात काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत रस्ते गुळगुळीत झाले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
उपासमारी आणि बेरोजगारी दूर झालीच पाहिजे
तसेच आपण जातीयतेचे विष कधीच पेरत नाही. उपासमारी आणि बेरोजगारी दूर झालीच पाहिजे. पुढील 5 वर्षांत विदर्भातून 50 लाख लिटर दूध निर्माण करण्याचा आमचा निर्धार आहे. वर्ध्यातील प्रत्येक शेतकऱ्याकडे 5 गायी असल्या पाहिजे. शेतकरी दुग्ध उत्पादकही व्हावा, हे माझे स्वप्न आहे. त्यासाठी ठिकठिकाणी गो-दुग्ध फार्म तयार करायचे आहेत, असे त्यांनी सांगितले.
भूलथापांना कोणीही बळी पडू नका
संविधान बदलण्याच्या भूलथापांना कोणीही बळी पडता कामा नये. जातीवाद व संप्रदायाचे विष पेरून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे. परंतु, हा डाव उधळून टाकण्याची आवश्यकता आहे. मतदारांनी जातीच्या नावावर नाही. तर गुणांच्या आधारावर उमेदवार निवडून दिला पाहिजे. सामाजिक विषमतेवर आधारित आरक्षण करतील. विकासाची दृष्टी असलेले उमेदवार आम्ही दिले आहेत.
भाजप हा एकमेव पक्ष जो…
तरुण, शेतकरी, महिला यांच्यासाठी काम करणारे, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी झटणारे उमेदवार भाजपने दिले आहेत. भाजप हा एकमेव पक्ष आहे, जेथे बुथवर काम करणारा कार्यकर्ता राष्ट्रीय अध्यक्ष बनू शकतो. मतदारांनी भाजपच्या उमेदवारांना निवडून द्यावे, असे आवाहन गडकरी यांनी यावेळी केले.