जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुका, 26 जागांवर 239 उमेदवार रिंगणात, परदेशी शिष्टमंडळ देणार भेट? (फोटो सौजन्य-X)
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या 2024 च्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. दुसऱ्या फेरीत सहा जिल्ह्यांतील एकूण २६ जागांसाठी मतदान होत आहे. या टप्प्यात 25 लाखांहून अधिक मतदार 239 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आज, दुपारी 1 वाजेपर्यंत 36.9 टक्के मतदान झाले. यापूर्वी सकाळी 11 वाजेपर्यंत 24.1 टक्के तर सकाळी 9 वाजेपर्यंत 10.22 टक्के मतदान झाले होते. मतदान केंद्रांवर कडेकोट बंदोबस्तात सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. तसेच जम्मूच्या सुरनकोट (अनुसूचित जमाती राखीव) जागेवर सर्वाधिक 14.57 टक्के मतदान झाले, तर पूंछ हवेलीमध्ये 14.56 टक्के मतदान झाले.
तसेच श्रीनगर जिल्ह्यातील सर्वाधिक आठ जागांवर दुसऱ्या फेरीत मतदान होत आहे. यानंतर रियासीमध्ये सहा, बडगाममध्ये पाच, रियासी आणि पूंछमध्ये प्रत्येकी तीन आणि गांदरबलमध्ये दोन जागांवर मतदान होत आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये 36.93 टक्के मतदान झाले. रियासी जिल्ह्यात सर्वाधिक 51.55 टक्के आणि सर्वात कमी 17.95 टक्के मतदान श्रीनगर जिल्ह्यात झाले. यापूर्वी 18 सप्टेंबर रोजी झालेल्या पहिल्या टप्प्यात 61.38 टक्के मतदान झाले होते. किश्तवाड जिल्ह्यात सर्वाधिक 80.20 टक्के मतदान झाले आणि पुलवामा जिल्ह्यात सर्वात कमी 46.99 टक्के मतदान झाले.
दरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये मुख्य लढत भाजप, काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स (आघाडी), पीडीपी यांच्यात असल्याचे मानले जात आहे. भाजपने जम्मूतील सर्व जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. दुसरीकडे, काश्मीरमध्ये मोजकेच उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. मेहबूबा मुफ्ती यांचा पीडीपी या दोन्ही मतदारसंघात निवडणूक लढवत आहे. याशिवाय अन्य छोट्या पक्षांनीही ही लढत रंजक करण्याचा प्रयत्न केला आहे.
तर दुसरीकडे काश्मीर खोऱ्यातील 15 विधानसभा मतदारसंघांमध्ये कंगन (अनुसूचित जमाती राखीव) जागेवर सर्वाधिक 13.52 टक्के मतदान झाले आहे. यानंतर चरार-ए-शरीफमध्ये 13 टक्के आणि गांदरबलमध्ये 12.06 टक्के मतदान झाले. हब्बकडल मतदारसंघात सर्वात कमी 2.63 टक्के मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यात 25.78 लाख मतदार 26 जागांवर 239 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत.
काश्मीरमधील श्रीनगर जिल्ह्यातील हजरतबल, खन्यार, हब्बाकडल, लाल चौक, चन्नापोरा, जदीबल, सेंट्रल शाल्टेंग आणि ईदगाह मतदारसंघात मतदान होत आहे. बडगाम जिल्ह्यातील बडगाम, बिरवाह, खानसाहिब, चरार-ए-शरीफ आणि चदूरा ब्लॉकमध्ये मतदान सुरू आहे. याशिवाय गांदरबल जिल्ह्यातील कंगन आणि गांदरबल या दोन मतदारसंघातही मतदान होत आहे. तर जम्मू विभागात गुलाबगड, रियासी, श्री माता वैष्णो देवी, कालाकोट-सुंदरबनी, नौशेरा, राजौरी, बुधल, थन्नामंडी, सुरणकोट, पूंछ हवेली आणि मेंढार येथे मतदान होत आहे.
जम्मू-काश्मीरमधील दुसऱ्या टप्प्यात समाविष्ट करण्यात आलेले अनेक भाग संवेदनशील आहेत. या टप्प्यात समाविष्ट काश्मीरमधील बहुतांश जागांवर फुटीरतावाद्यांचा प्रभाव दिसून आला आहे. यामध्ये खानयार, जदीबल, लाल चौक, ईदगाह, हजरतबल आदींचा समावेश आहे. हे लक्षात घेऊन चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF), जम्मू-काश्मीर पोलीस आणि इतर सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत.
विधानसभा निवडणुकीत सुरक्षेकडे निवडणूक आयोग विशेष लक्ष देत आहे. ईव्हीएमच्या सुरक्षेबाबत विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी सर्व मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगची सुविधा असेल.
जम्मू-काश्मीरमधील विधानसभेच्या 90 जागांसाठी तीन टप्प्यात मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात 18 सप्टेंबर रोजी 24 जागांसाठी मतदान झाले होते. दुसऱ्या टप्प्यात 26 जागांसाठी मतदान होत आहे. शेवटच्या टप्प्यात उर्वरित ४० जागांसाठी १ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. ८ ऑक्टोबर रोजी मतमोजणी झाल्यानंतर निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
जम्मू काश्मीर विभाजन झाल्यानंतर पहिल्यांदाच तिथं विधानसभा निवडणूक 2024 घेतली जात आहे. मात्र या निवडणुकीची निगराणी करण्यासाठी भारत सरकारनं 20 सदस्यीय शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. या शिष्टमंडळात चार सदस्य हे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे असणार आहेत. तर इतर सदस्य विविध देशातील असल्याची माहिती मिळत आहे. हे शिष्टमंडळ आज नवी दिल्लीला रवाना झालं आणि श्रीनगर, बडगाम आणि गंदरबल जिल्ह्यांमध्ये मतदानाचं निरीक्षण करणार आहे. शिष्टमंडळाचे सदस्य बडगाम आणि श्रीनगरमधील मतदारसंघांना भेट देतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.