मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता संपली आहे. निकाल हाती आला असून महायुतीच्या बाजूने निकाल लागला आहे. महायुतीला राज्यामध्ये एकतर्फी विजय मिळाला असून बहुमतापेक्षा अधिकचा आकडा महायुतीकडे आहे. मात्र अद्याप सरकार स्थापनेचा दावा करण्यात आलेला नाही. मात्र आता शपथविधी सोहळ्याची तयारी सुरु झाली आहे.
महायुती राज्यामध्ये सरकार स्थापन करणार असून मुख्यमंत्री हा भाजपाच असणार आहे हे स्पष्ट झाले आहे. मात्र मुख्यमंत्री कोण हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे राज्याचा पुढचा पाच वर्षाचा कारभारी कोण असणार याची उत्सुकता लागली आहे. मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे अद्याप जाहीर झाले नसले तरी राजशिष्टाचार विभागाकडून महायुतीच्या शपथविधी सोहळ्याची तयारी सुरु करण्यात आली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
राजशिष्टाचार विभागाकडून मुंबईमध्ये महाराष्ट्राच्या नवीन सरकारच्या शपथविधी सोहळ्याची तयारी करण्यात येत आहे. पूर्वी हा सोहळा वानखेडे मैदानावर होणार असल्याचे समोर आले होते. मात्र महायुतीच्या चर्चेमुळे हा सोहळा पुढे ढकल्यात आला. आता शिवाजी पार्कवर महायुतीचा शपथविधी सोहळा होणार असल्याची शक्यता आहे. यासाठी पाहणी सुरु झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, राजशिष्टाचार विभागाकडून शिवाजी पार्कची तयारी सुरु करण्यात आली आहे. शिवाजी पार्कवर शपथविधी सोहळ्यासाठी प्राधान्य दिले जात आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
शपथविधी सोहळ्यासाठी योग्य जागा व वेळ पाहिली जात आहे. अजित पवार यांनी येत्या 1 डिसेंबर किंवा 2 डिसेंबर रोजी शपथविधी होईल असे सांगितले आहेत. तसेच महायुतीची मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा देखील झाली आहे. यासाठी देवेंद्र फडणवीस, अजित पवार व एकनाथ शिंदे यांनी दिल्लीवारी करुन अमित शाह यांची भेट देखील घेतली आहे. आता शपथविधी सोहळ्याची तयारी सुरु झाली आहे. शिवाजी पार्कवर महायुतीचा शपथविधी सोहळा होण्याची शक्यता आहे.
लाडक्या महिला मंत्रींची संख्या वाढणार
राज्याच्या नव्या मंत्रिमंडळात महिला आमदारांनाही मोठी संधी मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. चार महिला आमदारांची वर्णी लागू शकते, यात अजित पवार गटाच्या 4, शिंदे गटाच्या 2 महिला आमदार सध्या विधानसभेत आहेत. तर 2 टर्मपेक्षा अधिक काळ निवडून येणाऱ्या महिला आमदारांनाहीमंत्रीपद मिळणार असल्याची माहिती आहे. त्यादृष्टीने संबंधित महिला आमदारांच्या सर्व प्रोफाईल्स दिल्लीतील केंद्रीय नेतृत्त्वाने मागवल्याची माहिती आहे.
शिंदे यांना केंद्रात मिळणार संधी?
एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या शिवसेनेसाठी 12 मंत्रिपदांची मागणी केली आहे. इतकेच नव्हे तर विधानपरिषदेच्या सभापतीपदाचीही मागणी केली आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या 12 मंत्रिपदांमध्ये गृहखाते आणि नगरविकास खात्यांचीही मागणी करण्यात आल्याची माहिती आहे. पालकमंत्रीपद देतानाही पक्षाचा योग्य सन्मान राखावा, अशीही मागणी एकनाथ शिंदेंनी केल्याची माहिती आहे. पण केंद्रीय नेतृत्त्वाकडून यासंर्भात शिंदेंना कोणतेही आश्वासन देण्यात आल्याची माहिती नाही.