Supriya Sule campaigning Yugendra Pawar Baramati Assembly Constituency
कण्हेरी : विधानसभा निवडणुकीची रंगत वाढत आहे. मतदानाला अवघा एक महिनादेखील राहिला नसून प्रचार जोरदार सुरु आहे. बारामतीमध्ये लोकसभा निवडणुकीप्रमाणे पवार कुटुंबामध्येच लढत होणार आहे. यंदाची विधानसभा निवडणूक काका विरुद्ध पुतण्या अशी असणार आहे. शरद पवार गटाचे बारामती विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल केला असून आता प्रचाराचा शुभारंभ झाला आहे. युगेंद्र पवार यांच्या पहिल्याच प्रचारसभेमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी तुफान राजकीय टोलेबाजी केली आहे. आता भाच्याच्या प्रचारासाठी आता विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उरतल्या आहेत.
कण्हेरीमध्ये शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ झाला. यावेळी सुप्रिया सुळे यांनी आपल्य भाषणामध्ये राजकीय विषयांवर भाष्य केले. खासदार सुळे म्हणाल्या की, “ही लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानीची आणि भ्रष्टाचाराविरोधात आहे. शेतकऱ्याला हमीभाव मिळत नाही, महिलांना सुरक्षा मिळत नाही, बेरोजगारी, महागाईच्या विरोधात ही लढाई आहे. ही कोणाची वैयक्तिक नाही तर वैचारिक आहे. विकास हा टीम वर्क असते कोणी एक करत नाही. जो विकास झाला तो खिशातल्या पैशांनी केलेला नाही. आमच्यावर सहा दशकं बारामतीकरांनी प्रेम केलं आहे,” असे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
हे देखील वाचा : सुहास कांदेंची भुजबळांच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ; छगन भुजबळ यांनी दिली प्रतिक्रिया
पुढे त्या म्हणाल्या की, “शरद पवार यांनी अनेक नवीन नेतृत्व राजकारणामध्ये आणलीत. आज पुन्हा एकदा ते तुमच्या सोबत राज्याच्या राजकारणामध्ये नवीन नेतृत्व घेऊन आले आहेत. एक सुशिक्षित, अमेरिकेमध्ये शिक्षण घेतलेला आणि सुसंस्कृत असा युवा तुमच्या सेवेसाठी आणला आहे. एक चांगलं सामाजिक परिवर्तन करण्यासाठी युवा नेतृत्व आणलं आहे. बारामतीची जनता किती हुशार आहे हे मला लोकसभेमध्येच कळालं आहे. न बोलता जे मनात आहेत तेच करतात,” असे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त करत युगेंद्र पवार यांच्यासाठी प्रचाराची सुरुवात केली.
सुप्रिया सुळे यांनी भर सभेमध्ये बारामतीमध्ये अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. सुप्रिया सुळे म्हणाले की, “महाराष्ट्रात सध्या बरेच कार्यक्रम सुरु आहेत. मी अनेक ठिकाणी लागलेले बॅनर पाहते. त्या बॅनरवर लिहिलेलं आहे की हे चिन्ह तुमचं नाही. या चिन्हाची लढाई न्यायालयात सुरु आहे. त्यामुळे ते (अजित पवार) विसरले असतील. आयोगात आम्ही तास न् तास बसल्यावर अनेकजण आमची मस्करी करायचे. आरे कॉपी करून पास होण्यात काय मजा? अभ्यास करुन पास होऊन सर्टिफिकेट घेण्याचा आनंद वेगळा असतो. मला आधी वाटायचं की सर्वजण गेले, आता आपलं काय होणार? मी लोकसभा निवडणुकीत मतदारसंघात दौरे करायचे. तेव्हा मला प्रश्न पडायचे की काय होणार? मात्र, मला लोकसभेच्या निवडणुकीत समजलं की, ताकद फक्त जनतेत असते आणि ते जनतेनं लोकसभेला दाखवून दिलेलं आहे,” असे म्हणत सुप्रिया सुळेंनी अजित पवार यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.