'जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना'; छगन भुजबळांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ
नाशिक : नांदगाव विधानसभा मतदारसंघा मागील अनेक दिवसांपासून नाट्यमय घडामोडींमुळे चर्चेत आला आहे. महायुतीमध्ये नांदगाव हा शिंदे गटाच्या वाट्याला आला आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून सुहास कांदे यांना उमेदवारी आली आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काल झालेल्या समीर भुजबळ यांच्या सभेत नांदगांव लोकशाही धडक मोर्चाचे पदाधिकारी शेखर पगार यांनी आमदार सुहास कांदे हे दहशत पसरवित दादागिरी करत असल्याचा आरोप केला. समीर भुजबळांच्या सभेतच शिवीगाळाची कॉल रेकॉर्डिंग ऐकवण्यात आली. त्यामुळे नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये राजकारण तापले आहे. यावर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यमांशी संवाद साधताना छगन भुजबळ सुहास कांदे यांच्या शिवीगाळ प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मी काही तिथे गेलो नव्हतो. तो अपक्ष उभा राहिलेला आहे. समीरने फॉर्म भरला आहे. काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. सुहास कांदे शिवीगाळ करत आहे असे त्या व्हिडिओमधून दिसून येत आहे. शेखर पगार यांनी भाषण केल्यावर सुहास कांदेंनी तिकडून शिवीगाळ सुरू केली. पगार हुशार होते त्यांनी माईक समोर मोबाईल धरला. सगळ्या नांदगावमध्ये स्पीकर लावले होते. घाणेरड्या शिव्या आणि दमबाजी दिसून आली. विनोद शेलार आणि समीर भुजबळ यांना शिव्या देण्यात आल्या. म्हणूनच भयमुक्त नांदगाव ही टॅगलाईन समीरने घेतली आहे. या क्लिप ऐकल्या तर का घेतली आहे हे सर्वांना समजेल. सामान्य जनता बोलू शकणार नाही असे आहे, असे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.
पुढे ते म्हणाले की, पोलिसांनी आणि महसूल विभागाने कारवाई करायला पाहिजे. अधिकारी प्रेशर खाली काम करत आहे. निवडणूक आयोगाने लक्ष दिले पाहिजे. योग्य ती कारवाई केली पाहिजे. लोकांना भयमुक्त वातावरणात मतदान करू दिले पाहिजे. निवडणूक आयोगाने भेदभाव करता कामा नये, योग्य असेल तेच करावे. इतर पक्षातील लोकांना, कार्यकर्त्यांना भीती दाखवली जात आहे. ते सगळे समीरला मदत करतील. त्यांनी विकास केला नाही, केवळ भीती दाखवली आहे. बाळासाहेब ठाकरे यांना कांदेंनी पाहिले नाही, समीर तर बाळासाहेबांच्या जवळ खेळला आहे. समीर भुजबळ स्थानिक प्रश्न मांडत आहे कोणताही नेता, अथवा पक्षाबाबत समीर बोलला नाही, असे म्हणत छगन भुजबळ यांनी सुहास कांदे यांनी शिवीगाळ प्रकरणावरुन राग व्यक्त केला आहे.
हे देखील वाचा : भाजपची चौथी यादी जाहीर, मीरा भाईंदरमधून नरेंद्र मेहता यांना तिकीट, उमरेडमधून कोण?