Raj Thackeray's son Amit Thackeray's entry into politics
माहिम : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून पक्षांकडून उमेदवार जाहीर केले जात आहेत. महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांनी आणि मनसेने उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. महायुतीमध्ये बरेच उमेदवार हे प्रस्थापित नेते नाहीतर त्यांचे नातेवाईक आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विधानसभेमुळे मोठी उलथापालथ होत आहे. यामध्ये सर्वात जास्त चर्चा आहे ती म्हणजे अमित राज ठाकरे यांच्या नावाची. राजकीय वर्तुळामध्ये सध्या अमित ठाकरे हे चर्चेच्या वर्तुळामध्ये आले आहेत.
राज्यामध्ये निवडणूक जाहीर झाल्यानंतर मनसे नेते राज ठाकरे यांनी आपली भूमिका जाहीर केली होती. यावेळी विधानसभेमध्ये इतर राजकीय पक्षांपेक्षा जास्त जागा मनसे लढवणार असल्याचे राज ठाकरे म्हणाले होते. त्याचबरोबर निकालानंतर मनसे सत्तेमध्ये असेल असे सूचक विधान राज ठाकरे यांनी केले होते. मनसेने दुसरी यादी जाहीर करत आपले उमेदवार जाहीर केले. यामध्ये राजपुत्र अशी ओळख असलेले अमित ठाकरे यांना पहिल्यांदाच उमेदवारी जाहीर झाली आहे. यामुळे मनसे पक्षामध्ये आणि युवा सेनेमध्ये एक उत्साह दिसून येत आहे. शिवतीर्थाबाहेर अमित ठाकरे यांचे अभिनंदन करण्यासाठी तरुणांची मोठी गर्दी होत आहे. राज्याच्या राजकारणामध्ये तरुण राजकारण्यांचे स्वागत नेत्यांकडून यानिमित्ताने केले जात आहे. माहिम विधानसभा मतदारसंघामध्ये देखील नवा उत्साह आणि प्रचाराचा धुराळा उडाला आहे.
अमित ठाकरे यांच्याकडे मनसेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्षपद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अनेक समस्यांवर अमित ठाकरे यांनी आवाज उठवला आगे. त्यांनीआत्तापर्यंत मनसेच्या अनेक आंदोलनांमध्ये सहभाग घेतला असून तरुणाईचा आवाज म्हणून पुढे येण्याचा अमित ठाकरे यांनी पूर्ण प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर राज ठाकरेंच्या सभेस्थळी देखील अमित ठाकरे यांची लक्षणीय उपस्थिती असते. आता विधानसभा निवडणुकीची उमेदवारी मिळवून अमित ठाकरे यांचा सक्रीय राजकारणामध्ये प्रवेश झाला आहे. माहिममधून ते मनसेचे उमेदवार म्हणून निवडणूक लढणार आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या नवनिर्माणातील राजसाहेबांचे शिलेदार !!
श्री. अमित राज ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अधिकृत उमेदवार माहीम विधानसभा.#MNSAdhikrut #विधानसभा_२०२४ pic.twitter.com/n82xgCOEgU— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) October 22, 2024
व्यक्त केल्या भावना
अमित ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, “माझ्या आत्मविश्वास खूप आहे. पण उमेदवार यादीत माझे नाव आल्यानंतर माझ्या पोटात गोळा आला. कारण आता मला समजलं आहे की माझं आयुष्य पूर्णपणे चेंज होणार आहे. “मी लहानपणापासून दादर माहीममध्ये वाढलो आहे. माझी आई, माझे वडील किंवा मी आमच्या तीन पिढ्या आम्ही इथे वाढलो आहे. त्यामुळे दादर-माहीम हा मतदारसंघ आम्ही जवळून ओळखतो. मी अनेकदा इथे चालत असताना मला अनेकजण भेटतात. ते त्यांच्या समस्या सांगतात. मी त्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे दादर-माहीम हा मतदारसंघ माझ्यासाठी एक कम्फर्ट झोन आहे,” असे मत अमित ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.
हे देखील वाचा : संभाजी ब्रिगेड अन् ठाकरे गटाची तुटली युती; मनोज जरांगे पाटलांची देणार साथ?
ठाकरेंची आणखी एक पिढी राजकारणात
अमित ठाकरे यांना उमेदवारी जाहीर होताच शिवतीर्थावर मोठा जल्लोष दिसून आला. शर्मिला ठाकरे यांनी अविनाश जाधव आणि राजू पाटील यांचे औक्षण केले. तर मिताली ठाकरे यांनी त्यांचे पती अमित ठाकरे यांचे औक्षण केले. यावेळी शर्मिला ठाकरे आणि मिताली ठाकरे यांनी मनसेच्या उमेदवारांचे औक्षण करताना म्हटले की, ‘आम्हाला ओवाळणीत एक रुपयाही नको, पण आमदारकी पाहिजे’, असे म्हणत भावनिक झाल्याचे दिसून आले. अमित ठाकरे यांच्याविरोधात अनेक नेते मैदानामध्ये आहेत. लोकसभेला पाठिंबा देऊन देखील महायुतीने माहिममधून उमेदवार जाहीर केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटातील सदा सरवणकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या गटातून पुतण्याविरोधात महेश सावंत यांना उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा आहेत. मात्र सध्या अमित ठाकरे यांची जोरदार चर्चा रंगली असून ते यंग हिरो ठरत आहेत. ठाकरे परिवारातील आणखी एक पिढी राजकारणामध्ये उतरली आहे, त्यामुळे राज्यभर चर्चा रंगली आहे.