
Amit Thackeray criticizes state government in social media post over Mulund Metro accident case
मुंबई : सध्या मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मेट्रोची कामे सुरु आहेत. यामुळे अनेकदा रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून येते. मात्र दोन दिवसांपूर्वी मेट्रोचा एक स्लॅब कोसळल्यामुळे एकाचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले. (Mumbai News) यावरुन नागरिकांची सुरक्षा आणि मेट्रोच्या कामाची गुणवत्ता याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावरुन मनसे नेते अमित ठाकरे यांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे. मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन हा प्रशासनाने केलेला खून असल्याचे म्हणत टीका केली.
अमित ठाकरे यांनी लिहिले आहे की, मुलुंडमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळून एका निष्पाप नागरिकाचा मृत्यू झाला. हा ‘अपघात’ नाही, तर प्रशासनाने केलेला ‘खून’ आहे! निकृष्ट दर्जाचं काम, सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून केलेला ‘जुगाड’ आणि वारंवार ताकीद देऊनही झालेलं दुर्लक्ष… याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
हे देखील वाचा : अजित पवारांच्या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्सला आगीचा फटका; ‘डाल में कुछ काला है’ म्हणत वडेट्टीवारांचा संशय
पुढे लिहिले आहे की, “तसेच, एकीकडे सरकारच्या हलगर्जीपणामुळे सामान्य मुंबईकरांच्या डोक्यावर मृत्यूचे स्लॅब कोसळत असताना, दुसरीकडे सरकार कोस्टल रोडवर गाणी वाजवणारे रस्ते बनवून स्वतःची पाठ थोपटून घेण्यात मग्न आहे. जपानची नक्कल करताना सरकार हे विसरतंय की तिथल्या जनतेला ‘जिविताची हमी’ आणि सर्व ‘मूलभूत सोयी’ मिळाल्या आहेत; आपल्याकडे घराबाहेर गेलेला माणूस जिवंत घरी परतेल की नाही याची खात्री नसताना हे बालिश हट्ट कशासाठी? प्रशासनाचा प्राधान्यक्रम नक्की काय आहे? ज्या गोष्टींची गरज नाही तिथे कोट्यवधी रुपये उधळायचे आणि जिथे लोकांच्या जिवाचा प्रश्न आहे तिथे मात्र रीतसर दुर्लक्ष करायचं?,” अशी टीका अमित ठाकरे यांनी केली आहे.
पुढे त्यांनी लिहिले आहे की, “दुर्दैवाने, हा काही पहिलाच ‘अपघात’ नाही. अशा अनेक घटना मुंबईकरांच्या जीवावर बेतल्या आहेत. कधी पूल कोसळतो, कधी होर्डिंग तर कधी बांधकामाचे स्लॅब अंगावर पडून निष्पाप लोकांचे प्राण जातात. जास्तीत जास्त चौकशीचे आदेश दिले जातात, पण परिस्थिती बदलत नाही. अनियंत्रित गर्दीमुळे होणारे रेल्वे अपघात, निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांमुळे लोकांचे जाणारे प्राण याची तर सरकार दरबारी दखलही घेतली जात नाही !”
हे देखील वाचा : ‘हर्षवर्धन सपकाळ यांना तात्काळ अटक करा!” टिपू सुलतानशी तुलनेवरून हेमंत पाटील आक्रमक
“धक्कादायक बाब म्हणजे, मुलुंड प्रकरणी कंत्राटदाराला ६ कोटींचा दंड होतो, पण ज्या कुटुंबाचा आधार गेला त्यांना फक्त ५ लाखांची शुल्लक मदत ? एखाद्या कुटुंबाची राखरांगोळी झाल्यावर त्यांच्या दुःखाची अशी ‘शून्यात’ गणना करताना सरकारला लाज कशी वाटत नाही?
नुकतीच अमेरिकेतील एका अपघाताची बातमी आपण वाचली. तिथल्या प्रशासनाच्या चुकीमुळे एका भारतीय मुलीचा मृत्यू झाला, तेव्हा तिथल्या सिस्टीमने जबाबदारी स्वीकारून कोट्यवधींची भरपाई दिली. प्रगत राष्ट्रांमध्ये माणसाच्या जिवाला किंमत असते, पण आपल्याकडे? आपल्याकडे लोकांच्या जिवापेक्षा सरकारला ‘इव्हेंटबाजी’ महत्त्वाची वाटते. आम्हाला गाणी गाणारे रस्ते नकोत, तर दर्जेदार रस्ते हवे आहेत ! मुंबईकर टॅक्स भरतोय तो तुमच्या ‘इनोव्हेटिव्ह स्टंट ‘साठी नाही, तर एका सुरक्षित आयुष्यासाठी… त्यामुळे हे असले ‘म्युझिकल’ नखरे थांबवा आणि आधी लोकांना एक सुरक्षित आयुष्य देण्याची ‘बेसिक’ मागणी पूर्ण करा. जनतेच्या जिवाशी चाललेला खेळ शांत…,” अशी टीका मनसे नेते अमित ठाकरे यांनी केली आहे.