Rajesaheb Deshmukh's promise to voters
परळी : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. मागील महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक जाहीर झाली. आता निवडणुकीला केवळ दोन आठवडे बाकी राहिले आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी करुन निकाल दिला जाणार आहे. त्यामुळे राज्यामध्ये प्रचाराचा धुराळा उडाला आहे. दिल्लीतील नेते राज्यामध्ये ठाण मांडून बसले आहेत. तर दुसऱ्या बाजूला पक्षाचे जाहीरनामा प्रसिद्ध केला जात आहे. उमेदवारांकडून आश्वासनांचा पाऊस पाडला जात आहे. सध्या परळीचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या आश्वासनाची सर्वत्र चर्चा आहे. त्यांच्या विधानामुळे चर्चांना उधाण आले आहे.
परळीमध्ये विधानसभा निवडणुकीमुळे राजकारण तापले आहे. दोन्ही राष्ट्रवादीमध्ये परळीमध्ये थेट लढत होणार आहे. त्यामुळे अजित पवार गट व शरद पवार गट यांच्यामध्ये प्रचार सभेतून हल्लाबोल सुरु आहे. अजित पवार गटाकडून धनंजय मुडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शरद पवार यांच्याकडून मराठा उमेदवार परळीमध्ये देण्यात आला आहे. शरद पवार यांच्याकडून राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आता राजेसाहेब देशमुख यांनी आश्वासनांचा पाऊस पाडला आहे. पण त्यांनी निवडणून दिले तर तरुणांची लग्न लावून देऊ असे अजब आश्वासन दिले आहे. यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
हे देखील वाचा : राज ठाकरे अन् मनोज जरांगे पाटलांमध्ये जुंपली; राजकीय टीका टिप्पणी सुरुच
परळीमध्ये प्रचार करताना राजेसाहेब देशमुख यांनी अजब आश्वासनं दिलं आहे. ते म्हणाले की, “परळीतील तरुण पोरांना लग्नासाठी विचारताना लोक विचारतात, पोराला नोकरी आहे का? सरकारच देत नाही तर कशी लागणार, काही उद्योगधंदा आहे का? पालकमंत्र्याचाच उद्योगधंदा नाही तर पोरांचा कसा असेल. यामुळे सर्व पोरांचं लग्न होणं अवघड झालं आहे. त्यामुळे सर्व पोरांना मी आश्वासन देतो, जर मी आमदार झालो तर सगळ्या पोरांची लग्न लावून देऊ, सगळ्या पोरांना कामधंदा देऊ”, असे आश्वासन राजसाहेब देशमुख यांनी दिले. “बाबूराव तुमचं लग्न करायचंय…त्यामुळे आगे बढो म्हणल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही”, असेही राजेसाहेब देशमुख म्हणाले. त्यांच्या या अजब आश्वासनाची सध्या जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.
कसं आहे परळीचं राजकीय समीकरण?
यापूर्वी झालेल्या 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला. त्यानंतर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला. आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीत हे दोघे भाऊ-बहीण एकत्र आले आहेत. त्यामुळे परळीतील राजकीय समीकरणेही बदलली आहेत. बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे मुंडे भाऊ-बहिणीला ही निवडणूक आव्हानात्मक ठरणार आहे. त्याचं कारण म्हणजे शरद पवारांनी धनजंय मुंडेंविरोधात दिलेला उमेदवार. राजेसाहेब देशमुख हे मराठा उमेदवार आहेत. लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र लढूनही काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनी पंकजा मुंडेंचा पराभव केला. त्यामुळे 2024 ची विधानसभा निवडणूकही तितकीच ताकदीची आणि चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.