मनोज जरांगे पाटील व राज ठाकरे यांच्यामध्ये वादंग निर्माण झाला आहे. (फोटो - सोशल मीडिया)
जालना : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीमुळे राजकारण रंगले आहे. नेत्यांच्या सभा आणि बैठका वाढल्या असून प्रचाराचा धुराळा उडाला आहे. काल (दि.05) कोल्हापूरमध्ये महायुतीसह महाविकास आघाडीने प्रचाराचा नारळ फोडला. तर मनसे व इतर पक्ष देखील प्रचाराला लागले आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरणार होती. मात्र त्यांनी निवडणुकीमधून माघार घेतली. यानंतर यावरुन आता राजकारण तापले आहे. मनसे नेते राज ठाकरे यांनी देखील जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. तर राज ठाकरेंच्या टीकेला जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
राज ठाकरे यांची लातूरमध्ये सभा पार पडली. यावेळी त्यांनी विविध राजकीय विषयांवर जोरदार टीका टिप्पणी केली. राज ठाकरे यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर देखील निशाणा साधला. राज ठाकरे म्हणाले की, “मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसतात. म्हणतात निवडणूक लढवू. नंतर म्हणतात नाही लढणार. पाडणार. तुम्हाला लढायचं तर लढा नाही तर नका लढू. प्रश्न एवढाच आहे की, आरक्षण कसं देणार ते सांगा. हे फक्त तुम्हाला झुलवत आहेत. राजकीय पक्ष फक्त भूलथापा देत आहेत. कारण अशा प्रकारचं आरक्षण मिळूच शकत नाही. मी फक्त सत्य परिस्थिती मांडतो,” असा घणाघात राज ठाकरेंनी केला.
पुढे राज ठाकरे म्हणाले की, “मी जरांगे पाटलांना भेटलो तेव्हा त्यांच्यासमोर मांडली. हा टेक्निकल विषय आहे. किचकट आहे. लोकसभेत कायदा बदलावा लागेल. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश घ्यावे लागेल आणि हा फक्त राज्याचा विषय नाही. महाराष्ट्रासाठी असं धोरण आखायला गेले तर प्रत्येक राज्यातील जाती उठतील. ते कुणालाही परवडणार नाही. हे होणार नाही हे सर्वांना माहीत आहे. प्रत्येक राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांना माहीत आहे,” असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लातूरच्या सभेमध्ये मांडले. तसेच जरांगे पाटील यांच्याबाबत काही प्रश्न देखील उपस्थित केले.
यावर आता मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी देखील राज ठाकरेंना सडेतोड उत्तर दिले आहे. जरांगे पाटील म्हणाले की, “आरक्षण कसे देणार माझ्या सामाजाला माहीत आहे, ते तुम्हाला नाही कळणार. आरक्षण काय आणि लढा टिकवणे काय असते तुम्हाला काय माहीत तुम्हाला अस्तित्व कसे संपवायचे हे तुम्हाला माहित आहे, आणि अस्तित्व कसे टिकवायचे हे माहीत आहे. त्यांनी त्या भानगडीत पडू नये, त्यांना मानणारा वर्ग आमचा (मराठा समाज)आहे. मी प्रामाणिक सांगतो त्यांनी या भानगडीत पडू नये. मराठा समाजाचा रोष अंगावर घेऊ नये, अशी माझी त्यांना सूचना आहे. आरक्षण कसे मिळत, ते मी दिले आहे, ते तुम्हाला माहीत नाही, तुम्ही त्या वेळी झोपेत होते,” असा खोचक टोला मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरेंना लगावला आहे.