अजित - रोहित भेटीवर राम शिंदेंची प्रतिक्रिया
अहमदनगर : राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेतेमंडळींना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यात माजी मंत्री राम शिंदे यांचा देखील पराभव झाला आहे. या पराभवानंतर राम शिंदे यांनी आपली खंत बोलून दाखवली. ‘पवार यांच्या कौटुंबिक कटाचा मी बळी ठरलो’ असे शिंदे यांनी म्हटले आहे.
हेदेखील वाचा : विधानसभा निवडणुकीमध्ये 50 पेक्षा कमी जागांवर अडकली गाडी, महाआघाडी झाली महापिछाडी
भाजपचे कर्जत जामखेड मतदारसंघतील पराभूत उमेदवार राम शिंदे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राम शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रोहित पवार यांनी पराभव केला आहे. त्यानंतर सोमवारी अजित पवार आणि रोहित पवार यांची कराडमधील प्रीतीसंगमावर भेट झाली. या भेटीत अजित पवारांनी रोहित पवारांना मिश्किल टोला लगावला.
‘ढाण्या थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर काय झालं असतं’, असा अजित पवारांनी रोहित पवारांना मिश्कील टोला लगावला होता. यावर सभा झाली असती तर निकाल वर-खाली झाला असता, अशी कबुली रोहित पवारांनी दिली.
कर्जत जामखेडमध्ये मी कटाचा बळी
यावर राम शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, कर्जत जामखेडमध्ये मी कटाचा बळी ठरलो हे आज दिसून आले. मी महायुतीचा धर्म पाळण्यासाठी अजित पवार यांच्याकडे प्रचारसभेची मागणी करत होतो. मात्र, त्यांनी वेळ दिली नाही. आज अजित पवार रोहित पवारांना म्हणाले, मी सभेला आलो असतो तर काय झालं असतं?, म्हणजे हा सुनियोजित कट होता हे सिद्ध झाले, असा आरोप राम शिंदे यांनी केला.
माध्यमांमध्ये बोलण्याची माझी नव्हती इच्छा मात्र…
निवडणुकीच्या संदर्भात माध्यमांमध्ये बोलण्याची माझी इच्छा नव्हती. मात्र, अजित पवार आज बोलले म्हणून मी माझी खंत व्यक्त केली. मला वाटते की पवार यांच्यातील कौटुंबिक कलाह दरम्यान काही करार झाले असावेत आणि त्याचा प्रत्यय कर्जत जामखेडमध्ये जाणवला. महायुतीच्या लोकांबरोबर असे होत असेल तर बरोबर नाही, अशी नाराजी भाजपचे पराभूत उमेदवार राम शिंदे यांनी व्यक्त केली.
हेदेखील वाचा : मोठी बातमी ! एकनाथ शिंदेंना आज द्यावा लागणार मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा? कारणही आलं समोर…